साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 18 फेब्रुवारी : आपल्या आसपासच्या वस्तू, गोष्टी आणि वास्तू या कोणत्या दिशेला तोंड करून असाव्यात, याबाबत प्रत्येकाचे काही ना काही नियम ठरलेले आहेत. भगवान शंकराच्या प्रत्येक मंदिरातही असाच एक नियम आहे. महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगाचे तोंड हे नेहमीच उत्तर दिशेला असते. या मंदिरात नेहमी जाणाऱ्यांना ही गोष्ट नक्की लक्षात आली असेल. पण, आपल्यापैकी अनेकांना याचा अर्थ माहिती नाही. कोल्हापूरमधील धर्मअभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी याचं कारण सांगितलं आहे. काय आहे कारण? शंकराच्या पूजेमध्ये शिवलिंगाची पूजा सर्वात महत्वाची आहे. शिवलिंग हे सगुण परब्रम्हाचे प्रकृती पुरुषाचे एकाकार स्वरूप मानले जाते. शिवलिंगाचा योनिपिठाचा भाग म्हणजे माता पार्वती आणि लिंगाच्या रुपात महादेव विराजमान असतात. शिवलिंगाच्या योनीपिठाची अर्थात खालच्या नाळेची दिशा नेहमी उत्तरेला ठेवलेली असते. त्यामागे काही कारणे आहेत. आपल्या परंपरेप्रमाणे किंवा भूतलावरील रचनेप्रमाणे कैलास पर्वताचे स्थान हे उत्तर दिशेला आहे. कैलासभूमीचे नित्य स्मरण रहावे, त्याचबरोबर शिवपुजना वेळी आपल्याला या कैलासभूमीची ओढ राहावी, हे यामागील महत्त्वाचं अध्यात्मिक कारण आहे. फार पूर्वीपासून अरण्यात, पाणवठ्याच्या शेजारी, अशा अनेक ठिकाणी शिवलिंगाची प्रतिष्ठापणा करण्याची परंपरा आहे. पृथ्वी एक मोठे चुंबक मानले जाते. लोहचुंबक हे नेहमी उत्तर-दक्षिण स्थिर असते. त्यालाच अनुसरून हे शिवलिंग अशा प्रकारे स्थापित केलेले असते. एखादा अनोळखी वाटसरू जर त्या वाटेने निघाला असेल, तर हे शिवलिंग पाहून कोणत्या दिशेला मार्गस्थ व्हायचे आहे हे त्याला समजते. एकूणच भगवान शिव हे अध्यात्मात मार्गदर्शक तर आहेतच, पण अशा प्रकारे भौतिकरित्या सुद्धा मार्गदर्शक ठरतात. हा देखील एक संकेत या शिवलिंगाच्या दिशेच्या निमित्ताने सांगता येतो, असे मालेकर यांनी स्पष्ट केले. महाशिवरात्रीला भांग घेण्याचा प्लॅन आहे? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video काही अपवादात्मक शिवलिंग भगवान शंकराच्या मंदिरात जरी शिवलिंगाची नाळ ही उत्तर दिशेला असावी असा संकेत असला, तरी वेरूळच्या घृष्णेश्वर, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात असलेला अतिबलेश्वर, बुधेश्वर, वाडी रत्नागिरी येथील केदारेश्वर अशा शिवलिंगांची नाळ मात्र काही अपवादात्मक परिस्थितीनुसार पूर्व दिशेला आहे. एकूणच पूर्व किंवा उत्तर असा जरी शिवलिंगाच्या नाळेची दिशा पाहायला मिळते. तरी देखील मुळात उत्तर हीच शिवलिंगाच्या नाळेची दिशा असावी असा शास्त्र संकेत आहे, असे प्रसन्न मालेकर यांनी सांगितले. शिवलिंगाचे निर्माल्य का ओलांडू नये? शिवाचे निर्माल्य न ओलांडण्याबाबत अनेक पुराणकथा प्रचलित आहेत. एकदा शिवाचे निर्माल्य ओलांडल्या नंतर गंधर्वाच्या सर्व सिद्धी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भगवान शंकराचा धावा करत स्तुती केल्यानंतर त्यांना पुन्हा त्या सिद्धी प्राप्त झाल्याची एक कथा आहे. त्यामुळे शिवलिंगाचे निर्माल्य कधी ओलांडू नये असं मालेकर यांनी स्पष्ट केलं. नागपुरात आहे राज्यातील सर्वात उंच शिवमूर्ती, पाहा तिथं कसा होणार उत्सव? Video महाशिवरात्रीची पूजा कशी करावी? महाशिवरात्रीच्या व्रताला अनुसरून दिवसभर उपवास धरावा. त्या दिवशी सकाळी नित्यनियमाने भगवान शंकराची पूजा करावी. मात्र सूर्यास्तानंतर प्रत्येक तीन तासाचे एक असे विभाजन करून रात्रीच्या चार प्रहरांमध्ये पूजा केली जावी. रात्रीला यामिनी म्हणतात, त्यावरूनच महाशिवरात्रीला रात्रीच्या चार यामांमध्ये पूजा करण्याचा प्रघात आहे. यापैकी प्रत्येक यामाला भगवान शंकराच्या पूजेचा मंत्र, अभिषेक, द्रव्य आणि नैवेद्य यांचे स्वतंत्र विश्लेषण विविध ग्रंथांमध्ये पाहायला मिळते. रात्रभर केलेल्या पुजेनंतर पहाटे पारणं करण्याचा हा महाशिवरात्रीच्या व्रताचा विधी आहे. हे काहीही शक्य झाले नाही तर महाशिवरात्री च्या सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत शिवलीलामृत, शिवपुराण अशा ग्रंथांचे पारायण करणे, भगवान शंकराच्या नामाचा जप करणे, 108, 501, 1008 या प्रकारे बेल वाहून शंकराची उपासना करणे, अशी देखील महाशिवरात्रीची पूजा आपण करु शकतो. अगदी थोडक्यात पूजा केली तरी ती फलदायी ठरते, असे हे महाशिवरात्रीचे विधान आहे, अशी माहिती प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे.