पुणे, 27 मार्च: पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटला (Pune Fashion Street Fire) रात्री 11 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे 15 बंब घटनास्थळी पोहचले होते, पण याठिकाणी असणाऱ्या गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. साधारण 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. अग्निशमन दलाच्या बचावकार्यमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याठिकाणी आगही आटोक्यात आणली गेली आणि जीवितहानी देखील झाली नाही. मात्र या घटनेदरम्यान अनेकांचे जीव वाचवून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करुन घरी निघालेल्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग विझवून घरी जात असताना रस्त्यात अपघात होऊन प्रकाश हसबे (Prakash Hasbe) मृत्युमुखी पडले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली होती. पुणे, पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल कशाप्रकारे काम करत आहे याची माहिती त्यांनी यावेळी दिली होती. माध्यमांना दिलेली ही त्यांची शेवटची प्रतिक्रिया ठरली. (संबंधित- PHOTOS: पुण्यात आगीमध्ये संसारच मोडून पडला! कष्टाने वाढवलेले व्यवसाय जळून खाक ) काल मध्यरात्रीच्या सुमारास कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली. त्यानंतर कॅम्पसहीत पुणे शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. ही आग विझवण्यासाठीच्या सगळ्या मोहीमेत पुढे होते ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे. आग विझल्यानंतर ते पहाटे घरी जायला निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. यामध्येच प्रकाश हसबे यांचे आज दुर्देवी अपघाताने निधन झाले. (संबंधित- पुण्यातील आगीत व्यापाऱ्यांचं करोडोंचं नुकसान, 500 हून अधिक दुकानं जळून खाक ) पुणे विमानतळ रस्त्यावर पीएमपीएल बसखाली प्रकाश हसबे यांची टु व्हिलर आली आणि त्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान पुणे विमानतळ पोलीस स्टेशन या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे