पुणे, 5 जानेवारी : आपण दररोज अपघाताच्या अनेक घटना ऐकत असतो. या अपघातांमुळे अनेकांचं आयुष्य उद्धवस्त होतं. पुण्यातील रमेश मुळीक यांचाही असाच अपघात झाला. त्या अपघातीची किंमत ते आयुष्यभर भोगत आहेत. पण, अपघातानंतर खचून न जाता त्यांनी आणि कुटंबीयांनी स्वत:चं ड्रायव्हिंग स्कुल सुरू केलंय. मुळीक कुटुंबीय इथंच थांबले नाहीत तर ते आता सर्वांनी सुरक्षित वाहन चालवावे म्हणून जागृती करत आहेत. एक अपघात झाला आणि… रमेश मुळीक यांचं पत्नी आणि मुलगी असं छोटं कुटुंब आहे. त्यांनी अपघात होण्यापूर्वी अनेक व्यवसाय केले. त्याचबरोबर त्यांना सायकल चालवण्याचाही छंद होता. वेगवेगळ्या राज्यातून त्यांनी सायकलवर भ्रमंती केली आहे. स्वत:चं ड्रायव्हिंग स्कुल सुरू करणं हे त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्याची धडपड सुरू असतानाच त्यांना अपघात झाला. एकेदिवशी सकाळी सायकल चालवत असताना त्यांना कारनं मागून धडक दिली. या अपघातानंतर मुळीक तब्बल 3 महिने कोमात होते. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. मुळीक कोमातून बाहेर आले पण, त्यांना 72 टक्के अपंगत्व आलं. दहा वर्ष तरी अंथरुणावरून उठू शकणार नाही, असं भाकित त्यांच्याबद्दल डॉक्टरांनी व्यक्त केलं होतं. आजोबांनी कमाल केली, 78 व्या वर्षी वेटलिफ्टिंग स्पर्धा जिंकली! पाहा Video संकटावर मात कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती अंथरुणावर खिळून होती. संपूर्ण मुळीक कुटुंबीयांचे यामुळे हाल सुरू होते. त्या सर्वस्वी प्रतिकुल परिस्थितही त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी पत्नी आणि मित्राच्या मदतीनं ड्रायव्हिंग स्कुल सुरू केलं. ते फक्त ड्रायव्हिंग स्कुल सुरू करुन थांबले नाहीत. आपल्याप्रमाणे इतरांचा चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवल्यानं अपघात होऊ नये म्हणून जागृती करणे हे त्यांनी आयुष्याचं ध्येय निश्चित केलं.
रमेश मुळीक आजही वॉकरच्या मदतीनं चालतात. त्यासोबतच त्यांचं ड्रायव्हिंग स्कुलही उत्तम पद्धतीनं सुरू आहे. आपल्या अपघाताला अप्रशिक्षित ड्रायव्हर जबाबदार होता. त्यामुळे त्यांच्या स्कुलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला योग्य प्रशिक्षण आणि सामाजिक कर्तव्याची जाणीव करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक रस्त्यामध्ये गाड्या बंद पडतात तर अशा वेळेस गॅरेजमध्ये जाण्यापूर्वी गाडी रिपेरिंगचे बेसिक शिक्षणही त्यांच्या ड्रायव्हिंग स्कुलमध्ये दिलं जातं. रस्ते सुरक्षा अभियानात सहभाग रमेश मुळीक यांचे संपूर्ण कुटुंबच रस्ते सुरक्षा अभियानात सक्रीय आहे. त्यांची आठवीतील मुलगीही या अभियानात यमाची भूमिका करुन सर्वांना व्यवस्थित गाडी चालवण्याचं आवाहन करते. त्यांच्या मोटार स्कुलमध्ये 18 ते 70 वयोगटातील वेगवेगळ्या व्यक्तींनी प्रशिक्षण घेतले आहे. मुळीक यांच्या कामामुळे आपल्यालाही प्रेरणा मिळते, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.