पिंपरी-चिंचवड, 6 सप्टेंबर: इलेक्ट्रिक डीपीचा (DP) स्फोट होऊन त्यातील ऑईल अंगावर उडाल्याने 4 महिन्यांच्या चिमुकलीसह आजीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चिमुकलीची आई गंभीर जखमी झाली आहे. शिवानी काकडे (वय-4 महिने) आणि शारदा कोतवाल (वय-52 ) अशी मृतांची नावं आहेत. भोसरी येथील इंद्रायणी नगरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. हेही वाचा… ‘सरकार’ नावाची व्यवस्था आहे कुठे? केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू, विखेंचा हल्लाबोल मिळालेली माहिती अशी की, या घटनेत शिवानीसह तिची आई आणि आजी गंभीररित्या होरपळले होते. सर्व जखमींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रविवारी पहाटे उपचारादरम्यान 4 महिन्यांची चिमुकली शिवानी आणि आजी शारदा कोतवाल या दोघांचा मृत्यू झाला. तर शिवानीची आई हर्षदा काकडे यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी भोसरी इंद्रायणी नगर येथे इलेक्ट्रिक डीपीचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. दरम्यान डीपीतील ऑईल शेजारी असणाऱ्या राजवाडा या इमारतीवर उडाले. त्यावेळी अंगणातील मोकळ्या जागेत हर्षदा या त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीला अंघोळ घालत होत्या. त्यांच्या आई शारदा कोतवाल या जवळ बसल्या होत्या. त्यावेळी अचानक घराच्या बाजूला असलेल्या डीपीचा भयंकर असा स्फोट झाला. डीपीमधील उष्ण ऑईल तिघांच्याही अंगावर पडलं. सर्वजण गंभीररित्या भाजले गेले. चिमुकल्या शिवानी हिला आई अंघोळ घालत होती. त्यामुळे तिच्या अंगावर कपडे नव्हते. त्यामुळे उष्ण ऑईल तिच्या शरीरावर पडलं. त्यात चिमुकली 60 टक्के भाजली होती. महावितरणनेच घेतला नात आणि आजीचा बळी भोसरी येथील इंद्रायणी नगरात असलेल्या डीपीमध्ये नेहमी स्पार्किंग होत होती. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देखील देण्यात आली होती. गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील डीपीमध्ये अचानक भीषण आग लागली होती. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवून दुरुस्ती केली. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डीपीचा स्फोट झाला आणि त्यामुळे शिवानी आणि तिच्या आजीचा नाहक बळी गेला. या घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप शिवानीचे नातेवाईकांनी केला आहे. हेही वाचा… …तर 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत लोकल, शाळा, कार्यालये सुरू होणार; TIFR चा अहवाल या घटनेची चौकशी सुरू केली असून जखमी आणि मृत व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. घटनेत कुणी दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.