पुणे, 21 एप्रिल: गजा मारणे प्रकरणी मोठी अपडेट समोर येते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्सवरून भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कुख्यात गुन्हेगार गजा मारणे रॅली प्रकरणात (Gaja Marne Rally Case) भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्यावर पुणे पोलिसांनी (Pune Police) ही कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी गजा मारणे तुरुंगातून सुटल्यानंतर रॅलीचं प्रकरण विशेष गाजलं होतं. यामध्ये संजय काकडे यांच्यावर या रॅलीसाठी गाड्या पुरवल्याचा आरोप आहे. त्याचप्रकरणी पुणे पोलिसांनी संजय काकडेंना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. काकडे यांच्या काही गाड्या गजा मारणेच्या रॅलीत असल्याची माहिती, या अंतर्गतच गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. काय आहे गजा मारणे रॅली प्रकरण? अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका झाली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. अगदी सिनेमा स्टाईलने गजा मारणे तळोजा कारागृहाच्या गेटमधून गाडीत उभा राहून हात उंचावून मोठ्या थाटात बाहेर पडला. यावेळी जेलसमोरूनच त्यांच्या गुंडांनी वाजत गाजत मिरवणूक काढली होती. (हे वाचा- VIDEO: मुंबईत शिवसेना नगसेविकेच्या राड्यानंतर डॉक्टरांचा सामुहिक राजीनामा ) गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे, तो मारणे टोळीचा म्होरक्या असून कोथरुडसह पुण्यात त्याची कमालीची दहशत आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणाव्यतिरिक्त त्याच्याविरोधात पुणे शहरासह जिल्ह्यात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.