पॅनकार्ड आधारला लिंक केलं नाही? मग आता दंडासाठी 6 हजार तयार ठेवा
पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून 30 जून 2023 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्याआधी अनेकदा त्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती; मात्र आता लिंकिंगची मुदत संपली असून, अद्याप ज्यांची पॅनकार्ड्स आधारशी लिंक केली गेली नसतील, ती कार्ड्स इन-ऑपरेटिव्ह अर्थात बंद करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे अशा व्यक्ती कदाचित 31 जुलै 2023 पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकणार नाहीत. पॅन एकदा इनऑपरेटिव्ह झालं, की ते पुन्हा ऑपरेटिव्ह अर्थात सुरू करण्यासाठी किमान 30 दिवसांचा कालावधी लागतो. बंद पडलेलं पॅन पुन्हा सुरू करण्यासाठी करदात्याला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. त्यामुळे करदात्याने दंड भरून पॅन आणि आधार लिंक केलं आणि त्यानंतर पॅन पुन्हा सुरू होण्याची वाट पाहिली, तर तेवढ्या काळात इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची 31 जुलै 2023 ही मुदत उलटून जाणार आहे. त्यामुळे त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरला जाईल. वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असलं, तर उशिरा इन्कमटॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठीचा दंड पाच हजार रुपये आहे. Tomato Price Hike : टोमॅटोच्या महागाईचा मॅक्डोनाल्ड्सलाही फटका, मेनूमधून टोमॅटो गायब त्यामुळे पॅन-आधार लिंक करून पॅन सुरू करण्याचा दंड एक हजार रुपये आणि इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरल्याबद्दलचा दंड पाच हजार रुपये असा एकूण सहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यास उशिरा रिटर्न भरण्याचा दंड एक हजार रुपये आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना दोन हजार रुपये दंड भरावा लागेल. टीमलीज रेगटेक या कंपनीचे संचालक सीए संदीप अगरवाल यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितलं, आर्थिक वर्षात काही करदायित्व असेल आणि तुम्ही इन्कमटॅक्स रिटर्न उशिरा भरला, तर अशा व्यक्तींना अनपेड टॅक्स अमाउंटवर व्याज भरावं लागण्याची शक्यता आहे. ते व्याज 31 जुलै 2023 या मुदतीपासून प्रत्यक्ष कर भरण्याच्या तारखेपर्यंत मोजलं जातं.इन्कम टॅक्स कायदा 1961च्या सेक्शन 234ए मधील तरतुदीनुसार उशीर झालेल्या प्रत्येक महिन्याला किंवा महिन्याच्या भागाला एक टक्का दंडाचा व्याजदर आकारला जातो.