साप अतिशय संतापलेले असताना त्यांची अशी झुंबड पाहणं लोकांच्या जीवावर बेतू शकतं.
मो. इकराम, प्रतिनिधी धनबाद, 19 जुलै : 4 जुलै रोजी उत्तर भारतात श्रावण सुरू झाला. तेव्हापासून सापांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या झपाट्याने समोर येत आहेत. ठिकठिकाणी शेतात सापांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. मुळातच पावसात असंख्य विषारी प्राणी बिळातून बाहेर येतात. त्यामुळे झाडा-झुडुपांमध्ये, अडगळीच्या ठिकाणी साप, विंचू आढळतात. खरंतर साप हा महादेवांचा अत्यंत प्रिय दागिना मानला जातो. शिवाय श्रावण महिना महादेवांना समर्पित असतो. त्यामुळे या दिवसांत सापांचं प्रेम पाहायला मिळालं की, काहीतरी शुभ घडणार, असं लोक मानतात. झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील वाघमाराचे लोक अशाच एका दृश्याचे साक्षीदार झाले. त्यांनी दोन सापांना अतिशय किळसवाण्या अवस्थेत एकमेकांच्या अंगावर सरपटताना पाहिलं. ते जमिनीवर एकमेकांच्या तावडीत असे सापडले होते की, मधूनच एकत्र 3 ते 4 फूट उंच हवेत उडी घेत होते. हे दृश्य पाहून अनेकांनी सापांचं रोमांचक नृत्य सुरू आहे असं म्हटलं, तर काहीजणांनी सापांचा रोमान्स सुरू असल्याचं मानलं. अनेकजणांनी ही झुंबड कॅमेऱ्यात कैद केली. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत माहिती मिळताच लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब सापांना ताब्यात घेतलं आणि सुखरूपपणे जंगलात सोडलं. दरम्यान, सापांच्या या अवस्थेबाबत सर्पमित्रांनी एक वेगळाच खुलासा केला. दोन साप एकमेकांवर सरपटणं म्हणजे प्रत्येकवेळी त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू आहेत असा अर्थ होत नाही. अनेकदा अशा अवस्थेत दिसणारे साप जीवांच्या आकांताने एकमेकांशी लढत असतात. ही लढाई त्यांच्या अस्तित्त्वाची असते. त्यामुळे जिंकण्यासाठी दोघं ताकदीने भिडतात. यातील जो साप हरतो त्याला तो प्रदेश सोडून जावं लागतं. त्यामुळे साप अतिशय संतापलेले असताना त्यांची अशी झुंबड पाहणं लोकांच्या जीवावरही बेतू शकतं. पुन्हा ज्योती मौर्य! नवऱ्याने जमीन विकून शिकवलं; बायकोने नोकरी मिळताच… मात्र प्रत्येकवेळी सापांमध्ये भांडणचं सुरू असेल असं नाही, काहीवेळा त्यांच्यात प्रेमसंबंधही घडत असतात. विशेष म्हणजे ज्या भागात सापांची प्रजनन क्रिया पार पडते, तिथे चांगला पाऊस होतो, शिवाय शेतीतून उत्पादनही चांगलं मिळतं, अशी मान्यता आहे.