रहमान, प्रतिनिधी बस्ती, 18 जुलै : एसडीएम ज्योती मौर्य प्रकरणात दररोज नवी माहिती उघड होत असतानाच यासारखी इतर अनेक प्रकरणंही झपाट्याने समोर येऊ लागली आहेत. ‘ज्योतीला मी शिकवलं एसडीएम म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी केलं आणि आता दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण करून तिने माझ्यावरच खोटे आरोप लावले आणि मला सोडायला निघाली’, असा आरोप ज्योती मौर्य यांचे पती आलोक मौर्य यांनी केला आहे. हे प्रकरण चांगलंच तापलं, मग आता त्यांच्यासारखेच इतर पीडित नवरेही ‘बायको शिकली आणि सोडून गेली’, अशी आपबिती मीडियातून जगाला सांगू लागले आहेत. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील धर्मसिंहपूर गावातून समोर आलं आहे. ‘बायकोला जमीन विकून शिकवलं. परंतु बायकोने मात्र सरकारी नोकरी मिळताच प्रियकरासोबत मिळून माझ्यावर हुंड्यासाठी छळाचा आरोप लावला आणि न्यायालयाकडे घटस्फोट मागितला’, असा आरोप एका नवऱ्याने केला आहे. या प्रकरणात नवरा अमित कुमार, बायको अर्चना आणि कथित प्रियकर धनंजय मिश्रा या व्यक्तींचा समावेश आहे.
अमित कुमार यांचे वकील अशोक ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अर्चनाने अमितविरोधात 498 कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातून अमितला जामीन मिळाला असून सध्या दोघांची समुपदेशन प्रक्रिया सुरू आहे. मात्र अमितवर अर्चना आणि धनंजय मिश्रा घटस्फोटासाठी दबाव आणत आहेत. त्याला मारहाणही करण्यात आली. याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.’ हे प्रकरण नेमकं काय आहे, पाहूया. ‘दागिन्यांवर फक्त बायकोचा अधिकार, पती दावा करू शकत नाही’, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय लग्नानंतर एक मुलगी, तरी बायकोच्या शिक्षणासाठी जमीन विकली. मिळालेल्या माहितीनुसार, अमित कुमार यांचं लग्न 2011 साली भुवनपूरच्या रहिवासी अर्चना यांच्याशी झालं. लग्नानंतर दोघांमध्ये सर्वकाही आलबेल होतं. दोघांना एक मुलगीही झाली. लग्नानंतर काही वर्षांतच अर्चनाने अमितला ‘मला आता चूल आणि मूल नाही करायचंय, मला शिकायचंय’, असं सांगितलं. अमितची आर्थिक परिस्थिती फार उत्तम नव्हती, मात्र बायकोच्या प्रेमाखातर त्याने त्याच्या वाट्याची वडिलोपार्जित जमीन विकली आणि अर्चनाला राज नर्सिंग अँड पॅरामेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. अर्चनाच्या नर्सिंग कोर्सला सुरुवात झाली. ती महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहायची. शिक्षणासह तिच्या राहण्याचा, जेवणाचा खर्चही अमितच करत होता. शिक्षण सुरू असतानाच महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांच्या पुतण्याने अर्चनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, असा आरोप अमितने केला आहे. जेव्हा जेव्हा तो अर्चनाला भेटायला महाविद्यालयात जायचा, तेव्हा तेव्हा हॉस्टेलमधील तिच्या खोलीत तिच्यासोबत धनंजय मिश्रा हा तरुण असायचा. अमितने त्याच्याबाबत अर्चनाला विचारलं असता, तिने तो माझा मित्र असल्याचं सांगितलं. बायको आणि मित्राचे संबंध खटकले. पाहता पाहता अर्चनाचा कोर्स पूर्ण झाला आणि भिंगा येथील एका रुग्णालयात तिला नोकरी मिळाली. शिक्षण झालं, नोकरी लागली तरीही अर्चना आणि धनंजयची मैत्री कायम होती. दोघं एकमेकांना भेटायचे. धनंजय त्यांच्या घरी येऊ लागला. ही बाब खटकताच अमितने धनंजयला जेव्हा घरी यायचं असेल तेव्हा आधी अर्चनाला एक फोन करून कळवत जा, थेट येऊ नकोस, असं व्यवस्थित समजवून सांगितलं. मात्र तरीही धनंजय त्यांच्या घरी आधीसारखाच येत असे. शिवाय त्याच्या आणि अर्चनाच्या भेटीगाठी आणखी वाढल्या होत्या. त्यामुळे तिच्यात आणि अमितमध्ये वाद होऊ लागले. अखेर अर्चनाने कौटुंबिक नायालयात हुंड्यासाठी छळ होत असल्याचं कारण देऊन घटस्फोटाची मागणी केली. धनंजयनेच तिला असं करायला लावलं, असा आरोप अमितने केला आहे. रस्त्यात गाठून मारहाण, जिवेमारण्याची धमकी. अमितने दिलेल्या माहितीनुसार, ‘हुंड्यासाठी छळ केल्याच्या प्रकरणात समुपदेशनासाठी तो 30 जून रोजी बस्ती न्यायालयात उपस्थित राहिला होता. न्यायालयातून घरी जात असताना खजुहा गावाजवळ धनंजय आणि काही लोकांनी त्याला रस्त्यात गाठून मारहाण केली आणि त्याचा मोबाईल काढून घेतला. शिवाय घटस्फोट दे नाहीतर, जिवंत मारून टाकू, अशी धमकीही त्याला दिली.’ आता हे प्रकरण न्यायालयात दाखल आहे.