केवळ परीक्षेसाठीच नाही, तर इतर कोणताही फॉर्म प्रचंड लक्षपूर्वक भरावा. नाहीतर अशा अडचणींचा सामना करावा लागतो.
नीरज कुमार, प्रतिनिधी बेगुसराय, 14 जुलै : तुम्ही परीक्षेला गेलात आणि तुमच्या हॉलतिकीटवर तुमच्या फोटोच्या जागी एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो असेल तर? पुढे काय होईल याचा अंदाज तुम्ही लावूच शकता. बिहारच्या ललित नारायण मिथिला विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तर खरोखर असे हॉलतिकीट मिळाले आहेत ज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी, अभिनेत्री कतरीना कैफ यांचे फोटो आहेत. त्यामुळे आता या विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे. अलीकडेच या विद्यापीठात परीक्षा पार पडल्या. एका विद्यार्थिनीचं परीक्षा केंद्र जीडी महाविद्यालयात होतं. तिथे ती ठराविक वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेलं हॉलतिकीट घेऊन दाखल झाली. मात्र तिला परीक्षेला बसवण्यास नकार देण्यात आला. प्राध्यापकांसोबत बराच वेळ झालेल्या वाद-विवादानंतर तिला परीक्षा देता आली. हे प्रकरण उघडकीस येताच विविध विद्यार्थी संघटनांनी या महाविद्यालयाविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.
जीडी महाविद्यालयाचे परीक्षातज्ज्ञ प्राध्यापक कमलेश कुमार यांनी सांगितलं की, ‘केवळ परीक्षेसाठीच नाही, तर इतर कोणताही फॉर्म प्रचंड लक्षपूर्वक भरावा. नाहीतर अशा अडचणींचा सामना करावा लागतो. हॉलतिकीटबाबत बोलायचं झाल्यास, ते ऑनलाईन जारी केले जातात. विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतःबाबत सर्व माहिती काळजीपूर्वक द्यावी लागते, शिवाय स्वतःचा फोटोदेखील जोडावा लागतो. विद्यार्थ्यांनी एकदा दिलेली माहिती आणि फोटो पुन्हा एकदा तपासून पाहावा. हॉलतिकीट जारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आयडी, पासवर्डने ते डाऊनलोड करता येतं.’ त्याचबरोबर हॉलतिकीटवर वेगळ्याच व्यक्तीचा फोटो आल्याबद्दल ते म्हणाले, ‘हा काही विद्यार्थ्यांचाच आगाऊपणा आहे. ज्यामुळे चुकीचे हॉलतिकीट छापून आले.’ शाहरुखच्या कासवांचे शाही नखरे; त्यांच्यासाठी आहे खास झोपाळा, प्रत्येक ‘मन्नत’ होते पूर्ण दरम्यान, बिहारमध्ये याआधीदेखील असा गोंधळ झाला होता. हॉलतिकीटवर विद्यार्थ्यांच्या नावाच्या जागी अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लियोनी या दोघांची नावं छापून आली होती. शिवाय त्यांच्या नावापुढे विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचं नावही लावण्यात आलं होतं. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. पालकही संतापले होते. तरीही आता पुन्हा हॉलतिकीटवर चुकीचे फोटो छापून आले आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या संतापाला सामोरं जावं लागतंय.