मोहन ढाकले, प्रतिनिधी बुरहानपूर, 13 जुलै : पाळीव प्राण्यांना एकदा जीव लावला की त्यांना आपल्यापासून दूर करणं फार अवघड होतं. ते आपल्याला घरातीलच एक सदस्य वाटू लागतात आणि तेही आपल्या सुख-दुःखात सहभागी होतात. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही त्यांच्या पाळीव प्राण्यांना जीवापाड जपतात. मात्र आज आपण कोणत्या सेलिब्रिटीच्या नाही, तर मध्यप्रदेशच्या बुरहानपूरमध्ये राहणाऱ्या शाहरुख हवालदार या सर्वसामान्य व्यक्तीच्या कासवांबाबत खास गोष्टी जाणून घेणार आहोत. शाहरुख यांनी 20 वर्षांपूर्वी मुंबईहून 2 कासव नेले होते. त्यांना तेव्हापासून त्यांनी अगदी आपल्या बाळाप्रमाणे जपलंय. त्यांचे कुटुंबीयही कासवांचे लाड करतात. खास त्यांच्यासाठी घरात एक झोपाळा आहे. या झोपाळ्यात कासव आनंदाने झोके घेतात. झोपाळ्यात बसल्याशिवाय ते जेवतही नाहीत. शाहरुख यांनी सांगितलं, ‘दररोज जवळपास 4 तास कासवांना झोपाळ्यात झोके द्यावे लागतात, तेव्हाच ते प्रसन्न राहतात आणि आम्हाला याचा अजिबात कंटाळा येत नाही.’
विशेष म्हणजे या कासवांचं दिवसभराचं वेळापत्रक ठरलेलं आहे. ते नेहमी ठरलेल्या वेळी जेवतात, ठरलेल्या वेळी झोपाळ्यात खेळतात आणि ठरलेल्या वेळीच झोप घेतात. त्यांना जेवण म्हणून टोमॅटो आणि काकडी दिली जाते. शिवाय ते टोमॅटो ज्यूसही पितात. मराठमोळ्या अभिनेत्याने 57 व्या वर्षी केलं सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न; पत्नी आहे 25 वर्षांनी लहान PHOTOS काही कासव पाण्यात राहणं पसंत करतात, ज्यांना बाहेर ठेवल्यास त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. तर याउलट काही कासव बाहेर राहणं पसंत करतात, ज्यांना पाण्यात ठेवणं धोकादायक असतं. शाहरुख यांचे हे दोन कासव बाहेर राहणारे आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे पाण्यात आणि बाहेर राहणारे असे एकूण सहा कासव आहेत. ज्यांना त्यांनी इतकं छान संभाळलंय की, पर्यटक आणि शाळेचे विद्यार्थी अनेकदा त्यांच्या घरी कासव पाहायला येतात.