केरळमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस
कन्नूर, 12 जून : देशभरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यात नुकताच एका कुत्र्यानं 11 वर्षांच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार मारलं. रविवारी (11 जून) संध्याकाळी ही घटना घडली. केरळचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी या घटनेबाबत ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. लोकसभेत या संदर्भात प्रश्न विचारल्यावर सरकारकडून कोणतंही स्पष्ट उत्तर देण्यात आलेलं नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘मिड डे’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातल्या मुझप्पिलनगड गावात रविवारी (11 जून) संध्याकाळी एका 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. एएनआयच्या वृत्तानुसार, नौशाद यांचा मुलगा निहाल रविवारी संध्याकाळी घराबाहेर गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शोध सुरू केला. जवळपासच्या भागात शोधाशोध केल्यावर मुजप्पिलनगड गावात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुलगा बेशुद्धावस्थेत सापडला, असं पोलिसांनी सांगितलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मुलाच्या शरीरावर प्राण्यानं हल्ला केल्यामुळे जखमा झाल्या होत्या. मुलगा सापडला, तेव्हा बेशुद्ध झाला होता. त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिथे पोचल्यावर डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. केरळमधील कोट्टायममध्ये गेल्या वर्षी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 12 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. केरळमधील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी यावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र कुत्र्यांना मारून हा प्रश्न सुटणार नसून त्याऐवजी शास्त्रीय मार्गानं तोडगा शोधला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. वाचा - दिल्लीत Ola, Uber आणि Rapido वर बंदी, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय केरळमधील काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी केरळमधील नुकत्याच घडलेल्या घटनेबाबत आज (12 जून) ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या प्रश्नाबाबत सरकारनं स्पष्ट उत्तर दिलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कन्नूरच्या केट्टीलाकाथू इथं कुत्र्याच्या हल्ल्यात नौशाद यांचा मुलगा निहाल याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं ऐकून अतिशय दुःख झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लोकसभेत या प्रश्नाबाबत आवाज उठवूनही सरकारनं स्पष्ट उत्तर दिलं नसून त्यामुळे केरळमधील हा प्रश्न अजूनही सुटला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या काही वर्षांत देशात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली. काही लोकांचा यात मृत्यूही झाला आहे. मीरत शहरात मे महिन्यात घराबाहेर खेळणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीचा कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला. मार्च महिन्यात दिल्लीतील वसंत कुंज भागात 7 व 5 वर्षांच्या भावंडांचा 2 दिवसांत 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला. हे मृत्यू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचा संशय आहे.