मुंबई, 17 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या विरोधात बोलणाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाही आहे. मात्र तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) वर केलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवरची असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. उर्मिला मातोंडकरने सपा राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. जया बच्चन अशा म्हणाल्या होत्या, की जे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत तेच इंडस्ट्रीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. जया बच्चन यांनी अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांच्यावर निशाणा साधत हे वक्तव्य केले होते. रवी किशन यांनी असे वक्तव्य केले होते की, चीन आणि पाकिस्तानातून भारतातीतल तरुणाईला संपवण्यासाठी ड्रग आणले जात आहे आणि फिल्म इंडस्ट्री देखील अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेली आहे. (हे वाचा- स्टारकिड म्हणून अनन्या पांडे ट्रोल; बॉलिवूड नेपोटिझमबाबत चंकी पांडे काय म्हणाला) कंगनाने देखील असा दावा केला आहे की, 99 टक्के फिल्म इंडस्ट्री स्टार्स हे ड्रगच्या अधीन आहेत. दरम्यान यावर उत्तर देताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एका मुलाखतीत असे म्हणाली होती की, ‘संपूर्ण देशसमोर ड्रग्जचा धोका आहे. तिला (कंगनाला) माहित आहे का हिमाचल हे ड्रग्जचे उगमस्थान आहे? तिने तिच्या स्वत:च्या राज्यापासून सुरुवात करायला हवी.’ बुधवारी कंगना-उर्मिलाच्या या वादाने वेगळे वळण घेतले. टाइम्स नाऊशी बोलताना कंगनाने असा आरोप केला की, उर्मिलाने दिलेली मुलाखत खूप अपमानास्पद होती, संपूर्ण मुलाखतीमध्ये उर्मिला तिला डिवचत असल्याचे ती म्हणाली. कंगना पुढे असे म्हणाली की, ‘माझ्या संघर्षांची थट्टा करणे आणि मी तिकीटासाठी भाजपाला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही’. (हे वाचा- अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवली, वाचा नेमकं काय आहे कारण) कंगना पुढे असे म्हणाली की, ‘उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी ना? जर तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही?’
कंगनाच्या या विधानानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यातून तिने कंगनाला तिचे नाव न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न केला असावा असे दिसते आहे. ‘जय महाराष्ट्र, जय हिंद, शुभ रात्री’ अशी कॅप्शन देत उर्मिलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘सूड माणसाला जाळत असतो, संयमच सुडावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय असतो.’