अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा 23 जून : भारत हा क्रिकेट प्रेमींचा देश आहे. अनेक तरूणांचं राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचं स्वप्न असतं. पण, यापैकी मोजक्याच खेळाडूंचं राष्ट्रीय टीममध्ये किंवा आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण होतं. वर्ध्याच्या सौरभ दुबेनं स्वत:च्या गुणवत्तेवर आयपीएल टीमपर्यंत धडक मारलीय. एका पुजाऱ्याचा मुलगा असलेल्या सौरभचा हा प्रवास कसा झाला हे पाहूया… कसा घडला सौरभ? वर्ध्या जवळचं म्हसाळा हे सौरभचं मुळ गाव. त्याचे वडिल एका मंदिरात पुजारी तर आई गृहिणी आहे. सर्वसाधारण कुटुंबातील सौरभनं त्याचा आयपीएल स्टार होण्याचा प्रवास लोकल 18 शी बोलताना उलगडून दाखवलाय. ‘माझा मोठा भाऊ क्रिकेट खेळत असे. मी त्याला फॉलो करायचो. मला अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये जास्त रस होता. दहावीनंतर कॉलेजध्येही क्रिकेटवर फोकस गेले. वेगवेगळ्या गावात मी क्रिकेट खेळायला जात असे,’ असं सौरभनं सांगितलं.
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी हा लहानपणापासूनच माझा आयडॉल आहे. मिचेल जॉन्सन, ट्रेन्ट बोल्ड, झहीर खान हे माझे आवडते बॉलर्स आहेत. आई, वडील आणि मोठ्या भावासह प्रशिक्षक रवी लुंगे आणि सुब्रतो बॅनर्जी यामुळे मला पुढं जाण्याची प्रेरणा मिळाली, असं सौरभनं सांगितलं. सौरभला दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली होती. गेली दीड वर्ष तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो दुखापतीमधून बरा होत असून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सराव करत आहे. आईचा होता विरोध, वडिलांनी दिला पाठिंबा, धोनीचा चेला MPL गाजवणार क्रिकेटसाठी खाल्ला मार ‘सौरभ लहान असताना तो क्रिकेटर होईल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. आम्ही त्याच्यासाठी कोणतीही स्वप्न पाहिली नव्हती. आमची तशी परिस्थितीही नव्हती. तो मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळायला जात असे. त्यानंतर तो अभ्यासापेक्षा क्रिकेटच जास्त खेळू लागला. तो क्रिकेट खेळून घरी परतल्यानंतर आम्ही त्याला रागवत असू, अभ्यासाकडं लक्ष द्यावं म्हणून मारलं देखील आहे. त्याला दुखापतीमुळे फार संधी मिळाली नाही. त्यानंतरही तो खूप मेहनत घेत आहे. त्याला या कष्टाचं नक्की फळ मिळेल, अशी भावना सौरभच्या आई रजनी दुबे यांनी व्यक्त केली. आयपीएल मध्ये खेळण्याची सौरभची पहिली संधी हुकली मात्र पुढच्या संधीचं तो सोनं करेल आणि जिद्दीने यश खेचून आणेल. टीम इंडियाकडून खेळण्याचं त्याचं स्वप्न आहे, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर तो हे स्वप्नही पूर्ण करेल अशी खात्री वर्धेकरांना आहे.