महाविकासआघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे सोफ्यावर
सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा, 14 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला आहे, यानंतर राज्यातला महाविकासआघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कर्नाटक निकालानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. शरद पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओकवर ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा खूर्चीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शेजारी सोफ्यावर बसले होते. तर शरद पवार हे वेगळ्या खूर्चीवर बसले होते. शरद पवार वगळता महाविकासआघाडीच्या सर्व नेत्यांची बसण्याची व्यवस्था सोफ्यावर करण्यात आली होती. महाविकासआघाडीच्या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी टीका केली आहे. ‘महाविकासआघाडी’च्या बैठकीत काय झालं? सिल्व्हर ओकच्या चर्चेची Inside Story ‘संख्याबळ घटल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान गेला आहे, त्यांना सामान्य सोफ्यावर बसण्याची वेळ आली आहे. हे मनाला खटकलं आहे. संख्याबळ नसल्यामुळे उद्धव ठाकरेंना सामान्य कोचवर बसण्याची वेळ आली आहे,’ असा टोला शंभुराज देसाई यांनी लगावला आहे. तसंच संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा भविष्य सांगणारा पोपट आहे, असा टोलाही शंभुराज देसाई यांनी लगावला आहे. खूर्चीचं राजकारण महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेवेळीही खूर्चीवरून राजकारण रंगलं होतं. संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीच्या नेत्यांपेक्षा वेगळी खूर्ची देण्यात आली होती, त्यावेळीही उलटसुलट चर्चा झाल्या. उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास आहे, त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे त्यांना वेगळी खूर्ची दिल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं होतं. संभाजी नगरच्या या सभेचं आयोजन शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलं होतं. यानंतर नागपूरमध्ये झालेल्या महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये सगळ्या नेत्यांसाठी सारख्याच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. नागपूरच्या या सभेचं आयोजन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. 5 लाखांच्या बक्षिसाला 10 लाखांचं प्रत्युत्तर, ठाकरे अन् शिंदेंच्या संजयमध्ये जुंपली!