पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, अजित पवार-शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार?
वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 10 जुलै : यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. पुण्यात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. 1 ऑगस्टला पंतप्रधान मोदी पुण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.दीपक टिळक यांच्याहस्ते हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. शरद पवार यांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे, पण शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीमध्य फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येऊ शकतात. पवार कुटुंबानंतर महाराष्ट्रात आणखी एका पुतण्याने सोडली काकांची साथ; अजितदादांना मोठा धक्का अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बहुसंख आमदारांसह बंड करत सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीचे 9 आमदार सत्तेमध्ये सहभागी झाले. एवढच नाही तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरही दावा ठोकला आहे. हा वाद सध्या निवडणूक आयोगात गेला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांना रिटायर व्हायचा थेट सल्लाही दिला. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या या बंडानंतर शरद पवार मैदानात उतरले आहेत. छगन भुजबळ यांच्या येवल्यामध्ये शरद पवारांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यानंतर आता शरद पवार दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावमध्येही जाणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार ही लढाई सुरू असताना 1 ऑगस्टच्या कार्यक्रमात अजित पवार-शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार का? याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. ‘माझ्या पुतण्याने सांगितल्यानंतर मी…’ छगन भुजबळ यांचा शरद पवार यांना खोचक टोला