रायचंद शिंदे, प्रतिनिधी जुन्नर, 10 जुलै : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर दोन्ही गटाकडून ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे. विशेष म्हणजे यात शरद पवार आणि छगन भुजबळ यांचा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जुन्नरमध्ये पाहायला मिळाला. आगामी निवडणुकीत तुम्ही पुन्हा नाशिकमधील येवला मतदार संघातून उभे राहणार का? असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला असता भुजबळ यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न केला की का नाही उभा राहणार? यावर पत्रकार म्हणाले कारण तुमचंही वय झालं आहे. यावर भुजबळ यांनी मिश्किल टोला लगावत माझा पुतण्या ज्या वेळेस मला म्हणेल की थांबा तेव्हाच मी थांबेल. आज छगन भुजबळ नाशिकवरुन पुण्यात जात असताना तटस्थ असलेल्या जुन्नरचे आमदार अतुल बेनके व माजी आमदार वल्लभ बेनके यांना भेटले. त्यानंतर News 18 लोकमतशी बोलताना सत्ता कारणातील अनेक कंगोरे मांडले. माजी आमदार वल्लभ बेनके आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलो होतो, असं सांगत आपण बेनकेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. अनेकांच्या मनात आहे. पवार साहेबांवर प्रेम आहे. पण पुढे कसं करायचं? या द्विधा मनस्थितीमध्ये काही लोक आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन, विचारात घेऊन शेवटी पुढे जायचं आहे. आपण निर्णय घेणार आहोत, अस भुजबळ यांनी सांगितले बेनके रोहित पवारांएवढे लहान नाहीत : भुजबळ बेनके काही नवीन नाहीत. ते रोहित पवार एवढे लहान पण नाहीत, ज्येष्ठ आहेत. त्यांना कळतंय विकासाच्या दृष्टीने लोकांच्या कामाच्या दृष्टीने आपल्याला काय करायला पाहिजे. काय निर्णय घ्यायला पाहिजे. हे लोक गेले तर का गेलेले आहेत. त्यांच्या पाठीमागचे कारण काय आहे? मुंबईच्या सभेत अजित पवार यांनी उघड केलं आहे. वाचा - धनंजय मुंडेंना कुणी दूर केलं? छगन भुजबळांचा रोहित पवारांवर पलटवार अजित पवार यांच्या शपथविधीत पहिल्या रांगेत बसलेले खासदार अमोल कोल्हे तिकडे कसे काय गेले? खासदार अमोल कोल्हे शरद पवार यांच्यासोबत कसे गेले ते त्यांनाच विचारा. शपथविधीच्या दिवशी ते अजित पवारांच्या बंगल्यावर होते. आमच्याबरोबर शपथ घ्यायला पहिल्या ओळींमध्ये ते बसले होते. आता ही मंडळी जी आहे समजदार मंडळी आहेत. त्यांना राजकारण समजतंय. आपण काय करत आहोत. मलाच कळालं नाही की नक्की काय झालं? पवार साहेब किती जणांची माफी मागणार? येवल्यात शरद पवारांनी जनतेची माफी मागितली. यावर प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, येवल्यातील लोक म्हणतात की साहेब अशा चुका तुम्ही नेहमी करा. त्यामुळे आमचा विकास होतो. चांगले उमेदवार आम्हाला मिळतात आणि मी त्यांना सांगितलं की आता 50 लोक जे आमदार निवडून दिलेत साहेब त्यातल्या किती लोकांची तुम्ही माफी मागणार?
मला 2004 ला जुन्नर विधानसभा लढवायची होती पवार साहेबांनी मला 2004 ला सुचवलं होतं की जुन्नर विधानसभेमधून निवडणूक लढवावी. माझ्या वडिलांची जन्मभूमी येथील जुन्नरचे येनेरे गाव आहे. भायखळा भाजी मार्केटमध्ये 150 वर्षांपेक्षा जुना आमचा गाळा आहे. तेव्हापासून माझ्या वाडवडिलांचा छोटासा भाजीपाल्याचा धंदा आहे. मार्केटचे सगळे लोक भुजबळांची ओळखीचे आहेत. शिवाय पुण्यामध्ये जुन्नर असल्यामुळे पुणे जिल्ह्यात माझीपण ओळखी आहेत. त्यामुळे धोका न घेता जुन्नरला उभे राहिले पाहिजे अस मला वाटत होतं. मात्र, मी खूप विचार केला आणि येवला-लासलगाव मतदार संघातील नागरिक त्यावेळी माझ्याकडं येऊन बसायचे. त्यावेळी लोकांचे म्हणणं खरं होतं की सगळ्यात दुष्काळी तालुका आणि त्यातही अतिशय मागास तालुका विकासाच्या बाबतीत म्हणून विकासासाठी भुजबळ साहेब तुम्ही आम्हाला पाहिजे. शेवटी मी साहेबांना सांगितलं जुन्नरचा विकास नक्कीच झालेला आहे. विकास काय कोणासाठी थांबत नाही. परंतु, येवला फारच मागासलेला होता. त्यासाठी मी तिथे उभा राहतो. मग मी स्वतःहून त्या ठिकाणी उभा राहून तो मतदारसंघ निवडला आणि चार-पाच वेळा निवडून आलो.