राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता का आहे?
मुंबई, 14 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार? या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. महाविकासआघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभेद दिसून आले. मग तो सावरकरांचा मुद्दा असो, अडानी प्रकरणाच्या जेपीसीची मागणी, पंतप्रधानांची डिग्री आणि ईव्हीएम. या प्रत्येक मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजपकडे झुकणारी भूमिका घेतली. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताना आमच्याशी चर्चा केली नाही, असं शरद पवार थेट म्हणाले. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात संशय कल्लोळ निर्माण झाला. अजित पवार भाजपसोबत जाणार का? या प्रश्नावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तर राष्ट्रवादीसोबत शिंदेंसारखा प्रयोग सुरू असून त्यांनाही ईडीची भीती दाखवण्याचा प्रकार सुरू असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. मुख्य म्हणजे शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीच्या 48 तासांच्या आत राऊतांनी राष्ट्रवादीमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या बातम्यांना दुजोराच दिला.
मतं ट्रान्सफर झाली नाहीत? मग राष्ट्रवादी काँग्रेस अस्वस्थ का आहे? मागच्या काही काळात झालेल्या निवडणुका तर यामागचं कारण तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो. पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर, अंधेरी पूर्व, कसबा आणि चिंचवड या 6 पोटनिवडणुकींमध्ये पंढरपूर आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. या दोन्ही ठिकाणी भाजपला राष्ट्रवादीचं आव्हान होतं. तर देगलूर, कोल्हापूर आणि कसब्यात काँग्रेसचा, अंधेरी पूर्वमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. म्हणजेच मागच्या 6 पोटनिवडणुकींमध्ये राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही, तर काँग्रेसने 3, ठाकरेंच्या शिवसेनेने 2 आणि भाजपने 2 जागा जिंकल्या.
शिक्षक-पदवीधरच्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने अनपेक्षितरित्या नागपूर आणि अमरावतीची जागा जिंकली. राष्ट्रवादीने स्वत:च्या कोट्यातली रायगडची जागा शेकापला दिली, पण तिकडे शेकापचा उमेदवार पडला. आघाडी आणि युत्यांमध्ये निवडणुका लढत असताना मतं ट्रान्सफर होण्याचं गणित कळीचा मुद्दा ठरतो. राज्यात झालेल्या मागच्या काही निवडणुकांचे निकाल बघितले तर जिकडे काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरला तिकडे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची मतं ट्रान्सफर झाली, पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मात्र पराभव पचवावा लागला, त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेस आणि ठाकरेंची मतं ट्रान्सफर झाली नाहीत का? याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या. महाराष्ट्रात युती-आघाडीचं राजकारण सुरू झाल्यापासून बहुतेक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सामना व्हायचा , तर काँग्रेस-भाजप अशी थेट लढत होते. निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची मतं ट्रान्सफर झाली नाहीत, तर त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो, यामुळेच तर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता नाही ना? ठाकरेंमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ? शिवसेनेमध्ये भूकंप झाल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक तर झालेत याशिवाय ते शिवसैनिक आणि मतदारांना भावनिक साद घालत आहेत. तसंच महाविकासआघाडीचं नेतृत्व म्हणूनही ठाकरेंना प्रोजेक्ट केलं जात आहे. काँग्रेसला अनपेक्षित यश 2019 च्या विधानसभा निवडणुका काँग्रेसनं वाऱ्यावर सोडल्याचं चित्र होतं. राहुल गांधी यांनी तर प्रचाराकडेच पाठ फिरवली होती, तरीही काँग्रेसला अनपेक्षित यश मिळालं. यानंतरच्या देगलूर, कोल्हापूर, कसबा आणि शिक्षक-पदवीधर निवडणुकांमध्येही काँग्रेसनं बाजी मारली. मतं ट्रान्सफरची गणितं, उद्धव ठाकरेंचं भावनिक कार्ड आणि महाविकासआघाडीचं नेतृत्व व्हायचा प्रयत्न आणि काँग्रेसचं यश या तीन कारणांमुळे राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकावर जायचा धोका आहे. शरद पवार हे महाविकासआघाडीचे जनक आहेत, तरीही राष्ट्रवादीला तिसरा भिडू व्हायची वेळ आली तर? यामुळेच राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली नाही ना? ईडीच्या रडारवर राष्ट्रवादी शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा… ED आणि जेलवारी. अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक अजूनही धारेवर आहेत. याच दरम्यान नजरेत आलेला मुद्दा म्हणजे - अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच शिखर बॅंक घोटाळ्यातून नाव वगळलं जाणं. आणि जेलवारीपेक्षा सेफ राहाणं तर सामान्य माणूसही निवडतो. अजित पवार-जयंत पाटलांमध्ये संघर्ष? राष्ट्रवादीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? यावरून कायमच चर्चा रंगत असतात, त्यातच मागच्या काही दिवसांपूर्वी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री असे वेगवेगळे पोस्टर मुंबईत लावण्यात आले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चाही कायमच रंगत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या अस्वस्थतेमागे ही पाच कारणं असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.