माझे पोस्टर लावू नका, शरद पवारांचा अजित पवारांना इशारा
मुंबई, 4 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर आता खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतला आहे. तसंच आपला फोटो वापरू नये, असा सज्जड इशाराही शरद पवारांनी दिला आहे. अजित पवारांच्या गटाकडून वापरण्यात येणाऱ्या पोस्टरवर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माशा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षाने माझा फोटो वापरवा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये,’ असं शरद पवार म्हणाले आहेत. खातेपाटप कसं होणार? खुद्द अजित पवार यांनीच सांगितली आतली बातमी कारवाईला सुरूवात दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर कारवाईला सुरूवात झाली आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर अजित पवारांनी आमदारांच्या सह्या घेऊन स्वत:ची गटनेते म्हणून निवड केली आणि मग राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेतलेल्या या 9 आमदारांना अपात्र करावं, अशी नोटीस जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवली. तर दुसरीकडे आपणही जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याची नोटीस पाठवल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्याची घोषणाही प्रफुल पटेल यांनी केली. जयंत पाटील यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचं प्रफुल पटेल यांनी जाहीर केलं. दुसरीकडे शरद पवार यांनीही प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबतचं पत्र शरद पवारांना लिहिलं होतं, त्यानंतर शरद पवारांनी ही कारवाई केली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडताच बीआरएस अॅक्टिव्ह; पुणे, नाशिकसाठी आखला खास प्लॅन