ठाकरे गटात अंतंर्गत गटबाजी?
मुंबई, 18 जून, उदय जाधव: आज मुंबईच्या वरळीमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर आहे. मात्र शिबीराच्या दिवशीच ठाकरे गटातील अंतंर्गत गटबाजी समोर आली आहे. आमदार सुनिल शिंदे आणि त्यांच्या परिवाराचे फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले आहे. वरळीमध्ये ठाकरे गटाचे एकूण तीन आमदार आहेत. त्यामध्ये आदित्य ठाकरे, सुनिल शिंदे आणि सचिन आहिर यांचा समावेश आहे. या तीन आमदारांपैकी सुनिल शिंदे आणि सचिन आहिर यांच्यामध्ये बेबनाव असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी दोन्ही आमदारांकडून वैयक्तिक रित्या बॅनर लावण्यात आले होते. प्रोटोकॉलनुसार दोन्ही आमदारांना एकमेकांचे फोटो बॅनरवर लावणं गरजेचं होतं. पण दोघांनीही एकमेकांचे फोटो बॅनरवर लावणं टाळलं. तसेच आमदार सुनिल शिंदे आणि त्यांच्या परिवाराचे फोटो असलेलं बॅनर फाडण्यात आलं आहे. मात्र हे बॅनर नक्की कोणी फाडलं हे अद्याप समोर आलेलं नाही. यावरून आमदार सुनिल शिंदे आणि सचिन आहिर यांच्यामध्ये बेबनाव असल्याची चर्च सुरू आहे.
मनिषा कायंदे शिंदे गटाच्या वाटेवर दरम्यान राज्यव्यापी शिबिरापूर्वीच ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आमदार मनिषा कायंदे या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा फोन शिबीर सुरू होण्यापूर्वीपासूनच नॉटरिचेबल आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मशाल चिन्ह देखील हटवलं आहे. त्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.