मुख्यमंत्री बदल होणार नाही, देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
मुंबई, 24 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 ऑगस्टला अपात्र होतील आणि त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तसंच राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील, अमोल मिटकरी आणि धर्मराव अत्राम यांनीही अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्य केली होती. या सगळ्या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असं सांगून फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? ‘आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, यात वावगं काही नाही. राष्ट्रवादीला वाटतं आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. भाजपला वाटतं आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच राहणार आहेत, दुसरा कोणताही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. मी आणि अजित पवार यांच्यात पूर्णपणे स्पष्टता आहे. महायुतीची चर्चा झाली तेव्हा अजितदादांना अतिशय स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे, एवढच नाही मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही, करण्याचं कारणही नाही, असं अजितदादा त्यांच्या वक्तव्यात म्हणाले आहेत’, असं फडणवीस म्हणाल आहेत. ‘महायुतीतले काही जण वक्तव्य करत आहेत, कनफ्यूजन निर्माण करणं तात्काळ बंद केलं पाहिजे. यातून महायुतीसंदर्भात संभ्रम तयार होतो. नेत्यांमध्ये संभ्रम नाही, शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहणार आहेत. कार्यकर्त्यांनीही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही’, या कठोर शब्दात फडणवीस यांनी सुनावलं आहे. सुनिल तटकरेंना मिठी का मारली? चर्चा वाढल्यानंतर जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण पृथ्वीराज बाबांना टोला ‘पृथ्वीराज बाबा जे बोलले अशी पतंगबाजी अनेकजण करत आहेत. अनेकजण भविष्यवेत्ये झाले आहेत. त्यांनी कितीही भविष्य सांगून आमच्या युतीमध्ये आणि राज्याच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मी अधिकृतपणे सांगतो, 9,10,11 तारखेला काहीही होणार नाही. काही झालंच तरी आमचा विस्तार होईल, त्याची तारीख ठरायची आहे. मुख्यमंत्री तारीख ठरवतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच राहतील’, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. ‘माझं वक्तव्य कानउघडणीसाठी पुरेसं आहे. समजनेवाले को इशारा काफी है. कुणाला काही वाटावं यात गैर नाही, पण बोलताना वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे. वास्तव हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहणार आहेत’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचीही कानउघडणी केली आहे. …अन् अजितदादा आपल्याच तीन आमदारांवर भडकले, मुख्यमंत्र्यांसमोरच झापलं