राहुल कुल यांना क्लीन चिट
मुंबई, 28 जुलै, अजित मांढरे : मोठी बातमी समोर येत आहे. आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारख्यान्यातील भ्रष्टाचाराबाबत राहुल कुल यांना राज्य सरकारने क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाल्यानं हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काय आहे नेमकं प्रकरण? आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत होता. या सर्व प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील लिहीलं होतं. मात्र आता या प्रकरणात राहुल कुल यांना राज्य सरकारकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. राज्य सरकारनं नेमकं काय म्हटलं? साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झालेला नाही. 2022-23 चा लेखा परीक्षण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये. मात्र 2021-22 च्या लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचं उत्तर राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाला देण्यात आलं आहे. तर इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.