मुंबई, 20 फेब्रुवारी: महिलांच्या पर्समध्ये (Ladies Purse) हमखास असणाऱ्या काही गोष्टींमध्ये ही वस्तू असतेच. रस्त्याने जाताना अचानक कधी चप्पल तुटली तर मदतीला येते ती हीच छोटीशी वस्तू. स्त्रियांना साडी (Saree) नेसताना तर हिची गरज असतेच असते. याशिवाय काही वेळा बटण म्हणूनही हिचा वापर केला जातो. अशी ही बहुपयोगी वस्तू म्हणजे अर्थातच सेफ्टी पिन (Safety Pin). सेफ्टी पिन या नावात ‘सेफ्टी’ हा शब्द आहे; पण त्याचा या वस्तूच्या नावाशी नेमका संबंध काय असा प्रश्न आपल्याला कधीही पडत नाही. सुरक्षित ठेवण्याव्यतिरिक्त अनेक प्रकारे वापर होणारी एका तारेने बनवलेली ही छोटीशी वस्तू आपण सतत वापरत असतो; पण तिच्या शोधाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसतं. संकटकाळी मदतीला येणारी ही सेफ्टी पिन खरंच छोटी असली तरी अत्यंत उपयोगी आहे. तिचा जन्मही अशाच एका गरजेतून झाला. त्याची कथाही अगदी मनोरंजक आहे. या सेफ्टी पिनचा शोध का आणि कोणी लावला ते जाणून घेऊ या. हे वाचा- फक्त 20 मिनिटांत कमावले 42 लाख रुपये; 18 वर्षांचा तरुण कसा झाला लक्षाधीश पाहा सेफ्टी पिनचा शोध लावला तो वॉल्टर हंट (Walter Hunt) या अवलियाने. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यासाठी तो प्रसिद्ध होता. असं म्हणतात, की वॉल्टर हंट याच्यावर खूप कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी तो एखाद्या नवीन गोष्टीच्या शोधात होता. एखादी नवीन गोष्ट विकसित करायची आणि त्याच्या विक्रीतून पैसे कमावून कर्जफेड करण्याचा त्याचा विचार होता. यातूनच त्यानं सेफ्टी पिनची निर्मिती केली. मीडिया अहवालानुसार , असं म्हटलं जातं की त्याच्या पत्नीच्या ड्रेसचं (Dress Button) बटण तुटलं होतं, त्या वेळी त्यानं एका तारेचा वापर करून बटणाची गरज भागवली. यानंतर त्यानं तारेपासून ही सेफ्टी पिन बनवली. तिला ड्रेस पिन (Dress Pin) असं म्हटलं जात असे. वॉल्टर हंटच्या जेव्हा लक्षात आलं, की ही छोटीशी गोष्ट अत्यंत उपयुक्त आहे, तेव्हा त्यानं या पिनसाठी घेतलेलं पेटंट 400 डॉलर्सना विकलं. सेफ्टी पिननं त्याचं कर्जामुळे फाटलेलं आयुष्यही सुरक्षित केलं-सांधलं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. याच वॉल्टर हंटनं सेफ्टी पिनसह पेन, चाकूला धार करण्याचं उपकरण, स्पिनर अशा विविध गोष्टींचा शोध लावला. शिलाई मशीनही (Sewing Machine) त्यानंच तयार केलं. हे वाचा- काळे अक्रोड म्हणजे पोषक घटकांचा खजिना; अनेक आजार रोखण्यास आहे फायदेशीर या ड्रेस पिनचा वापर अनेक ठिकाणी होऊ लागला. तारांच्या ऐवजी या पिनचा वापर केला जाऊ लागला. यामुळे बोटांना होणारी दुखापत खूप कमी झाली होती. लोकांची बोटं या पिनमुळे सुरक्षित राहू लागली. त्यामुळं ड्रेस पिन हे नाव मागं पडलं आणि सेफ्टी पिन हे नाव रूढ झालं. ड्रेस पिनऐवजी अन्य अनेक प्रकारे या पिनचा वापर केला जातो. आज भारतीय पारंपरिक पोशाख असणाऱ्या साडीसाठी तर ही सेफ्टी पिन अगदी अपरिहार्य बाब आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वापर केला जाणारी ही सेफ्टी पिन छोटीशी असली तरी फार मोठं काम करत आहे, यात शंका नाही.