प्रतीकात्मक फोटो
मुंबई, 09 डिसेंबर: पूर्वी दसरा-दिवाळी झाली की लग्नाचा सीझन (Wedding season) सुरू होत असे. मात्र, आता वर्षभर लग्नसोहळे पार पडतात. गेल्या काही आठवड्यापासून तर देशातील अनेक भागात लग्नांची धामधूम सुरू आहे. लग्न म्हटलं की, घरातील वडीलधारी माणसं मानपानाची तयारी करण्यात व्यस्त असतात तर वर-वधू आपल्या भावी जीवनाची स्वप्न रंगवण्यात तल्लीन असतात. लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत एखाद्या रोमँटिक डेस्टिनेशनवर (Romantic destination Placed) फिरण्यासाठी जावं, ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, लग्नामध्ये झालेला भरमसाठ खर्च पाहता अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते किंवा काही काळासाठी हनिमूनचा प्लॅन (Honeymoon Plan) लांबणीवर टाकावा लागतो. मात्र, नैसर्गिक विविधता असलेल्या आपल्या देशात अशी अनेक ठिकाणं (Budget Friendly Honeymoon Places) आहेत जिथे जाण्यासाठी आणि राहण्यासाठी कमी खर्च लागतो. उत्तर भारतामध्ये तर काही अशा जागा आहेत जिथे तुम्ही फक्त 20 हजार रुपयांमध्ये हनीमूनसाठी जाऊ शकता. हे वाचा- Skin Care tips : हिवाळ्यातही त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी या वेळेला लावा बॉडी लोशन नालदेहरा (Naldehra) नालदेहरा हे शिमला शहराच्या गजबजाटापासून दूर असलेलं एक अनोखं हिल स्टेशन आहे. येथील प्रसन्न वातावरण, हिरवळ आणि नयनररम्य निसर्ग या ठिकाणाच्या सौंदर्यामध्ये भर घालतात. आपल्या पार्टनरसोबत अॅडव्हेंचरस वॉकवर जाण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही घोडेस्वारीचाही आनंद घेऊ शकता. झिप लाइनिंगद्वारे येथील सुंदर दृश्ये तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी राहण्यासाठी स्वस्त दरांत कॉटेज किंवा हॉटेल रूम मिळेल. मनाली (Manali) लोक म्हणतात की, मनालीच्या हवेत प्रेमाचा सुगंध दरवळतो. मनालीतील हिरवळ, उंच पर्वत आणि स्वर्गासारखी भासणारी लहान मोठी ठिकाणं मनालीला एक सुंदर हनिमून डेस्टिनेशन बनवतात. या ठिकाणच्या डोंगरावर बांधलेली कॉटेज आणि जंगलाजवळ बांधलेली हॉटेल्स तुमच्या हनीमूनला अधिक रोमांचक बनवतात. सिझननुसार तुम्ही येथे पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, जंगल सफारी आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. जयपूर (Jaipur) जर तुम्हाला माफक खर्चामध्ये लक्झुरियस हनिमूनचा फील मिळवायचा असेल तर जयपूरपेक्षा दुसरी चांगली जागा मिळणं कठीण आहे. गुलाबी नगरी जयपूरच्या विविधरंगी रस्त्यांवरील मनमोहक दृश्य सोडून तुम्हाला परत घरी येण्याची इच्छा होणार नाही, अशी जादू तेथील हेवेमध्ये आहे. येथे तुम्ही रामगड तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता. हवा महलच्या समोरील रेस्टॉरंटच्या टेरेसवर बसून आपल्या जोडीदारासोबत पारंपरिक राजस्थानी पदार्थांची चव चाखू शकता. हे वाचा- बापरे! तुम्हालाही ‘ही’ लक्षणं जाणवत असतील तर आताच सोडा डायटिंग; अन्यथा… रानीखेत (Ranikhet) सुंदर नैसर्गिक दृश्यं आणि स्वच्छ शांत परिसर यामुळे रानीखेत एक अतिशय चांगलं हनिमून डेस्टिनेशन ठरतं. पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिमालयाच्या शिखरांचे मनमोहक दृश्यं रोमान्सला आणखी बहर आणतात. जंगलाला लागून असलेल्या रस्त्यांवर लहान-लहान स्टॉल्सवर तुम्हाला अतिशय चविष्ट नाश्ता मिळतो. शिवाय ट्रेकिंगला जाण्यासाठीही येथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मॅकलॉडगंज (McLeod Ganj) डोंगरांमधून वाहणाऱ्या धबधब्यांच्या सान्निध्यात हनिमूनचा आनंद घ्यायचा असेल, तर मॅकलॉडगंज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. येथील बर्फाच्छादित शिखरं, थंड हवा आणि जंगलांमध्ये बांधलेले काही आधुनिक आर्ट कॅफे तुम्हाला चांगला अनुभव देतील. या ठिकाणचे नड्डी आणि भागसू फॉल्स प्रसिद्ध आहेत. मॅकलॉडगंजमध्ये 20 हजार रुपयांमध्ये तुमचा हनिमून आरामात पूर्ण होईल. बीर-बिलिंग (Bir-Biling) तुम्ही हनिमूनसाठी बीर बिलिंगचा विचार करू शकता. हिमाचल प्रदेशातील हे सुंदर ठिकाण पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग किंवा मेडिटेशनसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला तिबेटी संस्कृतीची झलकही पाहायला मिळेल. 20 हजार रुपयांच्या माफक बजेटमध्ये तुम्ही सहज आपलं हनिमून सेलिब्रेट करू शकता. तीर्थन व्हॅली (Tirthan Valley) निसर्गप्रेमी लोकांसाठी हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅली एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. तीर्थन व्हॅली हिमालय नॅशनल पार्कपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ट्राउट माशांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी साधारण 20 हजार रुपयांमध्ये तुमचा हनिमून सेलिब्रेट होऊ शकतो. वरील सर्व ठिकाणं अतिशय सुंदर आहेत. शिवाय त्या ठिकाणी राहण्या-खाण्याचा खर्चही माफक आहे. त्यामुळे जर तुम्ही बजेट हनिमून (Budget Honeymoon) प्लॅन करत असाल तर, या ठिकाणांचा विचार करण्यास हरकत नाही.