‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “ पीजी स्टोरी ”चा हा अकरावा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील. ही गोष्ट आहे 27 वर्षांच्या प्रणव (बदललेलं नाव) नावाच्या मुलाची. वयाच्या 19 व्या वर्षी तो आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो जयपूरहून दिल्लीला आला. गेल्या आठ वर्षात तो दिल्लीत भरभरून जगला आणि अनेक अनुभव घेतले. तो पेशाने इंजिनिअर आहे. जयपूरहून दिल्ली विद्यापीठात शिकायला येऊन 3 वर्षं होऊन गेली होती. या काळात आलेली अनेक संकटं आणि अडचणी एका बाजूला तर मनासारखं जेवण मिळत नव्हतं, ही समस्या दुसऱ्या बाजूला. दिल्लीत बाकी सगळं मिळायचं, पण मनपसंत जेवण मिळावं, एवढे पैसे नव्हते. होते तेवढ्या पैशांत मिळणारं जेवण काही मला आवडत नव्हतं. एके दिवस खादी भांडारात गट्टे दिसले. पंजाबी लोकांना लस्सी आणि आलू पराठे पाहून जे होतं, ते आम्हा राजस्थानी लोकांना गट्टे पाहून होतं. गट्टे तयार करणं ही अवघड रेसिपी आहे. मात्र फक्त ते वाफवून त्याची भाजी करता येऊ शकते. युपीवाले, दिल्लीवाले, कॉलेजचे सगळे मित्र, रुममेट्स, त्यांच्या गर्लफ्रेंड्स या सगळ्यांना समजलं की मला गट्टे मिळाले आहेत. भाजी करण्यासाठी एक दिवस आम्ही निश्चित केला. गट्ट्याची भाजी करायचा दिवस जवळपास 8 ते 10 जण एकत्र जमलो. गट्टेचं पाकिट उघडलं तेव्हा समजलं की अगोदर ते वाफवून घ्यावे लागतील. मोठंच संकट होतं. आता गट्टे वाफवायचे कसे? मग लक्षात आलं की कुकरमध्येही ते उकडू शकतो. पण कुकरमध्ये वाफवण्यासाठी जाळी पाहिजे. ती काही आमच्याकडे नव्हती. अनेकांनी डोकं लावलं. पण काहीच उपाय सुचेना. मग गणित आणि फिजिक्स वापरूनही मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. पाकिटातून माझा नवाकोरा सँडो बनियन काढला. गट्टे कापून त्यात भरले आणि कुकरच्या तोंडावर ठेवले. पण वाफवून होईपर्यंत ते पकडणार कोण? हाताचा चांगलेच चटके बसायला लागले होते. हे वाचा - #PGStory: ती चाकू घेऊन धावत आली आणि म्हणाली, तू सामानासोबत माझा नवराही चोरलास! गट्ट्यांनी भरलेल्या बनियनला तसंच ठेवलं आणि वरून कुकरचं झाकण लावून टाकलं. मग वाटलं की जर जास्त वाफवले तर गट्ट्यांचा हलवा होईल. शिट्टी काढली तर कुकरचं पाणी बाहेर येईल. काय करावं बरं? मग एक उपाय सुचला. कुकरच्या झाकणावरची शिट्टी काढून टाकायची आणि तिथं काडेपटीतल्या दोन काड्या लावायच्या. म्हणजे वाफही बाहेर जात राहिल आणि गट्टे उकडतील.
कुणी टोमॅटो कापत होतं, कुणी लसूण सोलत होतं. कुणी दही आणायला गेलं होतं. कोई सॅलड करत होतं. सगळे थोड्या थोड्या वेळानं म्हणायचे, अहाहा! गट्ट्यांचा मस्त वास यायला लागलाय. सगळं एकदम परफेक्ट चाललं होतं. आता फक्त गट्टे उकडण्याचीच प्रतीक्षा होती. ते झालं की मसाला तयार करायचा आणि गट्ट्याची भाजी तयार करायची. सगळे गप्पांमध्ये रंगले होते. मी स्वयंपाकघरात गेलो आणि गट्ट्यांचं काय झालं ते पाहू लागलो. माझं अर्ध लक्ष मित्रांच्या गप्पांकडेच होतं. मागे वळून वळून त्यांच्या जोक्सवर हसत होतो. एकेक पाऊल कुकरच्या दिशेनं टाकत होतो. गॅसजवळ पोहोचून कुकरच्या दिशेनं हात पुढे केला आणि मला जोरदार धक्का बसला. एखाद्यानं उचलून पुन्हा रुममध्ये फेकून द्यावं, तसा. ब्लास्टचा जोरदार आवाज झाला. मी किचनच्या बाहेर खोलीच्या चौकटीपाशी पडलो होतो. सगळे शेजारी आपापल्या घरातून बाहेर आले होते. मी जोरजोराने किंचाळत होतो. ओह शिट.. आय एम डेड.. ओह शिट.. आय एम डेड.. मी नुसता ओरडत होतो. ओह शिट. हे काय झालं? चेहऱ्यासह सगळीकडे आग लागल्यासारखं वाटत होतं. कुकरचा स्फोट झाला होता. हे वाचा - #PGStory: मी त्याच्या अख्ख्या खानदानापुढं ओरडलो, कुंडीत लघवी करणं बंद करा ! मी खोलीत पडून ओरडत होतो आणि उकडलेले गट्टे माझ्या चेहऱ्यावर, मानेवर, गालांवर, कानांवर येऊन चिकटले होते. माझी गर्लफ्रेंड सगळ्यात जास्त रडत होती आणि भावाला जाम टेन्शन आलं होतं. कुणीच स्वयंपाकघराकडं पाहिलं नाही. सगळे माझ्याभोवती गोळा झाले होते. खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याएवढे पैसे नव्हते. कॉलेजच्या मेडिकल सेंटरमध्ये जाण्यासाठी बाहेर पडलो. त्यासाठी कॉलेजच्या आयकार्डची गरज होती. त्या गडबडीत कुणालाही आयकार्ड सापडत नव्हतं. गर्लफ्रेंड आणि भावासोबत तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरलो. मित्र म्हणाला, माझं आयकार्ड घेऊन जा. तो रिक्षा घेऊन आला पण आयकार्ड आणलंच नाही. गर्लफ्रेंड पुन्हा वर गेली. आयकार्ड विचारलं तर मित्र नर्व्हस होता. त्याला आयकार्ड सापडत नव्हतं. हातात सिगरेट घेऊन म्हणत होता की आधी मला लायटर हवंय. एक कश घेतल्यावर काहीतरी डोकं चालेल. त्याला लायटर घेऊन दिला. त्याने सिगरेट ओढली आणि मग त्याला आयकार्ड कुठं आहे, ते आठवलं.
मित्र चालत येत होते. रिक्षानं जाण्याएवढे पैसे कुणाकडेच नव्हते. मेडिकल सेंटरला पोहोचायला वेळ लागणार होता. मित्रानं दुकानातून एक बर्नाल घेतली. रिक्षा निघाली. तोपर्यंत माझ्या चेहऱ्यावर, नाकावर, मानेवर, कानावर चिकटलेले गड्डे सुकले होते. बर्नालच्या ट्यूबमध्ये ती फोडण्यासाठी गरजेची असणारी पिनच नव्हती. त्यानं रिक्षातील दांड्यांमध्ये दाबून ट्यूब उघडण्याचा प्रयत्न केला. त्यात भावाचं बोट सापडलं आणि जखम झाली. तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा हात रक्तबंबाळ झाला. आता आम्ही माझ्यासाठी नाही, तर भावासाठी मेडिकल सेंटरमध्ये चाललो होतो. पोहोचल्यावर त्याच्या बोटाला मलमपट्टी करण्यात आली. मग मी डॉक्टरांना भेटलो. ते म्हणाले की तू जळालेला नाहीस. त्या वेळी गरमागरम गट्टे चिकटले होते, त्यामुळे आग होत होती. मग फक्त त्याच्या बोटावर पट्टी लावून आम्ही परत आलो. मित्र घराच्या दरवाजातच सिगरेट ओढत उभे होते. वर पोहोचल्यावर किचनमध्ये गेलो. गॅस गेल्या तीन तासांपासून सुरूच होता. जयपूरवरून आणलेली जुनी गॅस शेगडी V शेपमध्ये वाकली होती. ठोकून ठोकून तिला पुन्हा सरळ केलं आणि खिचडी बनवून खाल्ली.