‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “ पीजी स्टोरी ”चा हा सहावा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअर साठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील. ही गोष्ट आहे 28 वर्षांच्या मौलश्रीची. ती 2015 साली पुण्यातून दिल्लीला आपलं स्वप्न साकार करण्यासाठी गेली होती. त्यानंतर आतापर्यंत तिनं दिल्लीतलं आयुष्य जगताना 5 नोकऱ्या बदलल्या आणि 5 घरं बदलली. आज ती एका मीडिया कंपनीत काम करते. पुण्यात एक वर्षभर नोकरी शोधत होते. देशातील निम्म्या लोकसंख्येप्रमाणे मलाही दिल्लीत काहीतरी मिळण्याची आशा वाटू लागली. तीनच दिवसांत दिल्लीला जाण्याचा निर्णय पक्का केला. एकच बॅग होती. ती उचलली आणि दिल्लीला गेले. दिल्लीनं असे काही अनुभव दिले, की ते आठवले तरी मला घाम फुटतो. दिल्लीला पोहोचल्यावर राहण्याची जागा शोधायला सुरुवात केली. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, उत्तम नगरपासून ते मालवीय नगरपर्यंत पूर्ण दिल्ली पालथी घातली. धक्के खाल्ले, नकार पचवले. अखेर नोएडात एक घर मिळालं. एका घरासाठी या शहरात एवढी मजल दरमजल करावी लागेल, याची कल्पनाही केली नव्हती. इथं काहीच सोपं नव्हतं. घर शोधायलाच इतका त्रास झाला की त्या 5 मजली इमारतीसमोर उभी राहून मी मैत्रिणीला म्हणाले, दिल्लीला येण्याचा निर्णय उगीचच घेतला असं वाटतंय. इथं का आले, निर्णय योग्य आहे का, पुढे काय होणार, पैसे कुठून येणार असे शेकडो प्रश्न मनावरचं ओझं वाढवत होते आणि माझा उत्साह कमी होत होता. पहिलं घर अखेर त्या 5 मजली घरात मला पीजी (पेइंग गेस्ट) म्हणून घर मिळालं. पीजीवाल्या काकी आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून बरं वाटलं. हे कुटुंब फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलं होतं. कुटुंबात एक आजीसुद्धा होती. नोएडाच्या घरातील रुममेट माझ्यानंतर दुसऱ्या दिवशी ती आली. मोठमोठ्या जाडजूड 4 बॅगा ती एकटी चौथ्या मजल्यावर चढवत होती. मी मदत ऑफर केली. मात्र तिनं एक दीर्घ हास्य करत नकार दिला. वेशभूषा आणि एकंदर व्यक्तीमत्व पाहता साधारण पस्तीशीतली वाटत होती. चार बॅगा एकटी उचलून आणणाऱ्या या तरुणीचं नाव होतं पूजा आणि ती विवाहित होती.
मी काही विचारण्याअगोदरच तिनं स्वतःविषयी सांगायला सुरुवात केली. लग्नापूर्वी ती याच घरात राहत होती. ती शाळेत असताना इथली घरमालकीण तिची शिक्षिका होती. या कुटुंबासोबत पूजाच्या कुटुंबाचं काही नातंसुद्धा आहे. तीन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं. त्यानंतर ती पतीसोबत द्वारका भागात राहत होती. आता तिचा पती परदेशी गेल्यामुळे ती इकडं राहायला आली होती. त्यानंतर मग माझी सासू कशी कजाग आहे, नणंद कशी भिकार आहे वगैरे वगैरे बडबड करत तिनं काही वेळात सगळी कुंडलीच माझ्यासमोर उघड केली. एक दिवस मी तयार होत होते. त्यावेळी ती जवळ आली आणि म्हणाली की तुझ्यात मला माझ्या छोट्या बहिणीचं रुप दिसतं. तू मला दिदी बोलाव. तिनं मला माझ्या कपड्यांच्या रंगाच्या इयर रिंग्स दिल्या. मला ही चांगली मैत्री आणि रुममेटशिपची सुरुवात आहे, असं वाटलं. ती पूर्ण दिवस घरातच असायची. नोकरी करत नव्हती. मी थिएटर जॉईन केलं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ तिथेच जायचा. रात्री घरी आल्यावर अनेकदा जेवणही तयार असायचं. त्यानंतर हळू हळू ती मला तिच्या खासगी आयुष्याविषयी काही ना काही सांगत राहायची. एके दिवशी ती म्हणाली की माझे पतीसोबत कधीही शारीरिक संंबंध आले नाहीत. पती जवळ आला की मी घाबरून बेशुद्ध पडायचे. पतीचा स्वभाव त्यामुळे चिडचिडा झाला होता आणि त्याचं एक अफेअरही होतं.
वागण्यात झाले अनेक बदल कधी ती गरजेपेक्षा फारच गोड व्हायची, तर कधी साध्या चमच्यासाठी किंवा प्लेटसाठीही कडाक्याचं भांडण करायची. तिची छोटी बहीण आमच्या घराच्या शेजारच्या इमारतीतच राहायची. मी विचारलं, दोघी बहिणी एकत्र का राहत नाही? त्यावर ती म्हणाली की त्या पीजीत जागा नाही आणि इथल्या आंटीमुळे मला हा पीजी सोडायची इच्छा नाही. आपली बहीण स्मार्ट आहे, असं ती अनेकदा सांगायची. मी तिच्या बहिणीसारखीच दिसते, असं अनेकदा ती म्हणायची. पण आपल्या बहिणीविषयी बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायचे. तिच्या डोळ्यात राग दिसू लागायचा. दोन बहिणींमधील स्पर्धेचा हा परिणाम असेल, असं मला वाटायचं. मग एक दिवस अचानक ती पीजीतून निघून गेली. तिला ट्यूमर झाल्याचं समजलं होतं आणि तिची तब्येत बिघडली होती. मी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिने उचललाच नाही. तोपर्यंत थिएटर करता करता मी नोकरीही सुरु केली होती. दिवस जणू पंख लावल्याप्रमाणे उडून चालले होते. नोकरीमुळे घरी येण्याची आणि बाहेर पडण्याची माझी वेळ सतत बदलत असे. एक दिवस ती घरी आली. मी तिच्याकडं विचारपूस केली. मी हजारदा विचारूनही तिनं काहीच उत्तर दिलं नाही. आता ती मी सोडून घरातल्या प्रत्येकाशी बोलत होती. ती भयानक रात्र एका रात्री मला झोपेतून जाग आली आणि पाहिलं तर पूजा माझ्याजवळ उभी राहून एकटक पाहत होती. मी जाम घाबरले. मी तिला असं उभं राहण्याचं कारण विचारलं. ती काहीच बोलली नाही. हसली आणि बेडवर झोपली. त्या रात्री मला नीट झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी मी पीजी मालकिणीकडे तक्रार केली आणि रात्रीचा पूर्ण प्रसंग सांगितला. उत्तरादाखल मला असं काही ऐकवण्यात आलं, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. ती दररोज माझी तक्रार त्यांच्याकडे करत होती. अंघोळीला बराच वेळ लावणे, घाणेरडे वायू सोडणे, तिच्या प्लेटमध्ये जेवणे अशा अनेक तक्रारी तिने केल्या होत्या. घरमालकिणीनं अशा गोष्टी सांगितल्या ज्यातली एकही गोष्ट खरी नव्हती. मालकिणीला तिच्याविषयी सहानुभूती वाटत होती. ती म्हणाली, आई नसलेली पोर आहे. संवेदनशील आहे. तक्रार केल्याच्या दिवसापासून मला माझं सामान कधी कचऱ्याच्या डब्यात तर कधी जमिनीवर फेकून दिलेलं दिसायचं. अंघोळीला गेले तर तिने बाहेरून कडी लावून टाकली. हे सगळं इतक्या पटापट घडत गेलं की विचार करायलाही वेळ नव्हता. तिलाही एका कंपनीत नोकरी मिळाली होती. एक दिवस दुपारी मला क्लाएंटला भेटायला जायचं होतं. मी सकाळी 9 वाजता उठून टीव्ही बघत बसले होते. गॅसवर भेंडीची भाजी शिजायला ठेवली होती. घरात फक्त मी आणि ती दोघीच होतो. ती तणतणत आली, फ्रीज उघडला आणि ओरडू लागली. मी तिचं दुधाचं पॅकेट चोरलंय म्हणून… मी शांततेत समजावलं की दीदी तू फुल क्रीमवालं दूध आणतेस आणि मी डबल टोन मिल्क घेते, असं सांगितलं. चोरी करण्याचा प्रश्नच नव्हता. रागाच्या भरात तिनं दुधाचं पाकिट फोडलं आणि सगळं दूध जमिनीवर सांडलं. मग जोरजोरात किंचाळू लागली, तुझ्यासारखी वाईट मुलगी मी कधीच पाहिली नव्हती. माझ्या कपाटातून काजू-बदाम चोरतेस, माझं सामान चोरतेस, इतकंच नाही माझा नवराही चोरलास.
असं म्हणून तिनं माझी भाजीची कढई उचलून खाली फेकली. मी जाम घाबरले. पळत जाऊन घरमालकिणीला बोलावलं. काकाही आले. भाजी जमिनीवर सांडली होती. मालक आणि मालकिणीला बघून ती आणखी जोरजोरात किंचाळू लागली. “तुझ्यासारख्या छोट्या शहरातल्या मुलींना मी बरोबर ओळखते. नोकरीच्या नावाखाली काय काय करत राहतात पैसा कमावण्यासाठी मला ट्युमर झाला होता, तेव्हा तू माझी खिल्ली उडवत होतीस देव करो, तुलाही ट्यूमर होवो. तुझ्या बहिणीलाही ट्यूमर होवो, तुझ्या पूर्ण खानदानाला ट्यूमर होवो.” ती तोंडाला येईल ते बडबडत होती. काका-काकींनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. तिला काय झालं होतं काय माहित? तिथला चाकू घेऊन ती माझ्या मागेच लागली. जी आपल्या बहिणीला धोका देते, ती आणखी कुणाची कशी होऊ शकेल? तू माझी खिल्ली उडवलीस, बघ तुझं कधीच लग्न होणार नाही, असं काहीवाही बडबडत राहिली. तिची ती बडबड समजण्यापलिकडची होती. तिचा राग आणि वेडसरपणा समजण्यापलिकडचा होता. मी दरवाजा बंद करून बसून राहिले. काका-काकींनी तिला समजावून ऑफिसला पाठवलं. ती जाताच मला बोलावलं आणि सांगितलं, “माफ कर, पण तुला हे घर सोडावं लागेल. तुम्हा दोघींनाही हे घर सोडावं लागेल.” मलाच तिथं राहण्याची इच्छा नव्हती. ऑफिसमधून सुट्टी घेतली. दोन तासांत नवं घर शोधलं आणि दुपारी 4 वाजतचा तिकडं शिफ्ट झाले. ती पूजा अजूनही माझ्यासाठी एक रहस्यच होतं. तिच्या अशा वागण्याचं काय कारण असू शकेल? तिला काय झालं असेल? तिच्या नवऱ्याला मी ओळखतही नाही, तरीही मी तिचा पती चोरला, असं का वाटत असेल तिला? हे गुपित काही काळानंतर उलगडलं. नव्या घरात एक मुलगी भेटली जी पूजाला ओळखत होती. तिनं जे सांगितलं, त्यामुळे हे रहस्य उकललं. तिच्या विचित्र वागण्याचं कारण पूजाचा पती परदेशात वगैरे गेलाच नव्हता. तो भारतातच होता आणि मयूर विहारमध्येच राहत होता. पूजाला त्याच्यासोबत राहायचं होतं, मात्र तो तिला सोबत ठेवायला तयार नव्हता. पूजाच्या पतीचं इतर कुणासोबत नव्हे, तर तिच्या बहिणीसोबतच अफेअर होतं. मग माझ्या लक्षात आलं. ती मला तिची छोटी बहीण समजत होती. त्यामुळे तिच्या नजरेत तिच्या छोट्या बहिणीची प्रतिमा ती माझ्यात पाहत होती. हे समजल्यावर मला वाईट वाटलं. तिची दयाही आली. पण मी काहीच करू शकत नव्हते. आज पूजा कुठे आहे, तिचं आयुष्यात पुढे काय झालं, यातलं मला काहीच माहित नाही. तिला तिचा मार्ग मिळाला असावा, हीच अपेक्षा.