ही गोष्ट आहे 27 वर्षांच्या प्रणव (बदललेलं नाव) नावाच्या तरुणाची. वयाच्या 19 व्या वर्षी हा तरुण जयपूरहून दिल्लीला आला. आपली स्वप्नं पूर्ण करण्याची उमेद मनात घेऊन त्यानं दिल्लीत 8 वर्षं काढली. तो पेशानं इंजिनिअर आहे. त्याची #PGStory त्याच्याच शब्दांत..
----------------------------------------------------------
‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “पीजी स्टोरी”चा हा पाचवा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील.
------------------------------------------------------
जयपूरहून दिल्लीला येऊन आणि दिल्ली विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात करून एक वर्ष होऊन गेलं होतं. फ्लॅटमध्ये वर्षभर तीन मित्रांसोबत राहत होतो. त्यांना वैतागून तो चांगला फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला आणि नवी रुम शोधली. हंसराज कॉलेजसमोरच्या चाळीसारख्या रस्त्यावर असणाऱ्या इमारतीत हा फ्लॅट होता. त्याचं भाडं महिन्याला 3500 रुपये होतं.
चाळीत मधोमध एक मोकळी जागा होती आणि त्याच्या चारही बाजूंना खोल्या होत्या. माझ्या रुमच्या डाव्या बाजूला घरमालकाची खोली होती. उजव्या बाजूच्या खोलीत आणखी एक मुलगा राहत होता. तिन्ही खोल्यांची मिळून एकच बाल्कनी होती. खोलीच्या बाहेर, रस्त्यावर पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. वॉशरुमला जाण्यासाठी तिथं ठेवलेला एक तांब्या बुडवून पाणी बाहेर काढावं लागायचं.
जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे माझे जुने मित्रही तिथंच येऊन राहू लागले. काही दिवसांनी कायमस्वरुपी माझ्याच रुमवर राहायला आले. अगोदर माझ्या बेडवर मी एकटा झोपायचो. हळूहळू दोघं आणि नंतर तिघं झोपू लागलो.

आतापर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा घरं बदलली, तेव्हा तेव्हा तिथं पार्टी केलीच होती. त्या नियमानुसार या घरातही पार्टी केली. जमिनीवर गाद्या अंथरल्या आणि त्या रात्री आमच्या रुममध्ये एकूण 13 जण झोपलो.
कजाग घरमालक
90 वर्षांचा हा पुरुष. जवळपास 6 फूट उंचीचा. धिप्पाड शरीर आणि काळा रंग. हळू हळू चालणारा. कुर्ता पायजमा घालणारा. मी इंदिरांसोबत चहा प्यायलो आहे. सोनियांना चहा पाजला आहे, काँग्रेसी नेत्यांसोबत आपली ओळख आहे, अशी टिमकी सतत वाजवत राहणारा. त्या दिवशी दोन रुपये राहिले होते, एक वाटी साखर नेली होती ती परत का केली नाही अशा प्रश्नांवरून किरकिर करणारा.
एक दिवस आम्ही त्याला थंड पाणी मागितलं. त्यानं कोल्ड्रिंकच्या एका बाटलीतून ते आम्हाला दिलं. आम्ही त्याची बाटली परत द्यायला विसरलो. अनेक दिवसांनी तो बाटली मागायला आला. आम्ही कित्येक तास ती बाटली शोधली, पण सापडली नाही. मग आठवलं की भंगारवाल्याला ती विकली होती. मात्र तो त्या बाटलीसाठी अडून बसला होता.

शेवटी आम्ही कोल्ड्रिंकची एक बाटली विकत आणली, त्यातलं ड्रिंक एका ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि ती बाटली त्याला देऊन टाकली. त्यावरही तो तक्रार करत राहिला. या बाटलीला कोल्ड्रिंकचा वास येतो, अशी.
बाल्कनीतील कुंड्यांमध्ये करायचा लघवी
>रोज सकाळी उठून बाल्कतील आल्यावर लघवीची घाण यायची. अगोदर आम्ही दुर्लक्ष केलं. रस्त्त्यावरून कुठूनतरी वास येत असेल, असं वाटायचं. उन्हाळ्याच्या दिवसात पहाटे तीन वाजता अचानक लाईट गेलेे. मी उठून बाहेर आलो. बाहेरचं चित्र पाहून मला जबर धक्काच बसला. आमचा घरमालक ए. पी. शर्मा बाहेर लावलेल्या तुळशीच्या आणि झेंडूच्या झाडांमध्ये मूत्रविसर्जन करत होता. ही गोष्ट मी मित्रांंना सांगितली. त्यानंतर काही दिवस आम्ही त्याच्यावर पाळत ठेवली. तो रोजच असं करत होता.
एक आठवडा आम्ही हे सहन केलं आणि नंतर त्याला सांगून टाकलं. मी तर थेट म्हणालो, की रोज रात्री तुम्ही बाल्कनीत जी शू-शू करता त्याचा प्रचंड घाणेरडा वास आम्हाला येतो. त्यांनी वाईट वाटून घेतलं नाही. पण म्हणाले की दुर्गंधी येत असेल, तर ती सहन करावीच लागेल. कारण रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडून पलिकडे असणाऱ्या वॉशरुमपर्यंत जाताना भिती वाटते. घराबाहेर लावलेला वीजेच्या बल्बमध्ये अधिक भाडं येतं, असं वाटून त्याने काढून टाकला होता. मी इथंच लघवी करणार, असं तंबी त्याने दिली. भाडेकरू या नात्याने आम्ही काहीच करू शकत नव्हतो.
यावर काहीच उपाय दिसत नव्हता. घरमालक अंधाराला घाबरतो, त्यामुळे तो इथेच शू करणार होता आणि आम्हाला त्याचा वास सहन करावा लागणारच होता. 90 वर्षांच्या माणसाला तुम्ही सांगणार तरी काय? घर शोधायला सुरुवात केली. नवं घर मिळालं , पण कधी बदलायचं हे निश्चित ठरत नव्हतं.
एका शनिवारी घरमालक आमच्या खोलीत आले आणि म्हणाले की त्यांची मुलं आणि मुलगी उद्या घरी येणार आहेत. तुम्हीही लवकरच घरी पोहोचा आणि मित्रांना उद्या आणू नका, असं त्यांनी सांगितलं. घरी मदत लागली, तर तुम्ही हजर असलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. आम्ही बाहेरच्या मित्रांना घरी पाठवलं आणि त्याची सूचना मान्य केली. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही तयार होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच दुर्गंधी. आता मात्र आम्हाला हा प्रकार असह्य होत होता. यावर काहीतरी करायलाच पाहिजे, असं वाटत होतं. काहीच विचार न करता मी माझ्या खोलीतून उठलो आणि थेट त्यांच्या खोलीत गेलो. आतून गप्पा मारल्याचा आवाज येत होता. त्यांची मुलगी आणि इतर बरीच पाहुणे मंडळी आतमध्ये होती.
मी - काका, जरा बोलायचंय. बाहेर येता का?
काका - इथंच सांग जे असेल ते
मी - नको, तुम्ही बाहेर या.
काकांचा मुलगा - अरे, सांग सांग. इथं सगळे आपलेच आहेत.
(आता मी काय बोलणार, या विचाराने सगळेच शांत)
मी - काका, तुम्ही बाल्कनीत जी शूशू करता ना, ती तुम्हाला बंद करावी लागेल.
#PGStory: डेटवर गेलेल्या मैत्रिणीला बोलावण्यासाठी करावा लागला Ambulance ला कॉल
(खोलीत सन्नाटा….. मी माझ्या खोलीत परत आलो.)
मागून घरमालक आले आणि ओरडले. आत्ताच्या आता सामान गुंडाळा आणि इथून निघून जा इकडून.
आम्ही पहिल्यापासूनच तिथून निघण्याच्या मूडमध्ये होतो. नवी रुमही शोधली होती आणि सामानाचं पॅकिंगही झालं होतं. एका महिन्याची नोटीस देण्याचा त्रासही वाचला. तसं पाहिलं तर झालं काहीच नाही, पण सगळ्यांसमोर त्यांची ही घाणेरडी सवय सांगितल्यामुळे बरं वाटत होतं. मी काकींनाही एक टीप दिली. म्हटलं, सकाळी चहा करताना त्यात ही तुळस नका घालत जाऊ.
काकी - का?
मी - कारण काका रोज त्या झाडावर शूशू करतात.
आंटी - शांत
नव्या घरात सामान घेऊन जाऊ लागलो. खोलीतील सीएफएल आणि भिंतीवरचं घड्याळ तिथंच विसरलं होतं. रिक्षा करून परत आलो. मात्र तोपर्यंत तिथलं सामान गायब झालं होतं. काकांकडे मागितलं तर ते तोंडावर हात धरून गप्प बसून राहिले.
दिल्लीतील त्या घरमालकाला आम्ही आजही विसरू शकलो नाही. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.