जीवघेणा हनीमून!
चेन्नई, 11 जून : सध्या लग्नाआधी आणि लग्नानंतर फोटोशूट करण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. आपापल्या बजेटनुसार लोक फोटोशूटसाठी डेस्टीनेशन निवडत असतात. जगावेगळी आठवण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकदा धोका पत्करुन फोटोसेशन केल्याची उदाहरण आहे. मात्र, कधीकधी असा धोका जीवावर बेतू शकतो. अशीच एक घटना चेन्नईतील नवविवाहीत दाम्पत्यासोबत घडली आहे. चेन्नई येथील एक नवविवाहित जोडपे बाली येथे हनिमूनसाठी गेले होते. यावेळी फोटोशूटसाठी वॉटरबाईकवरून जात असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. 1 जून रोजी त्यांचा थाटामाटात विवाह झाला होता. लोकेश्वरन आणि विबुष्णिया अशी मृत नवविवाहित जोडप्याची नावे आहेत. पती लोकेश्वरनचा मृतदेह शुक्रवारी तर पत्नी विबुष्णियाचा मृतदेह शनिवारी हाती आला. विबुष्णियाचे वडील सेल्वम आणि नातेवाईकांना अपघाताची माहिती मिळताच ते इंडोनेशियाला गेले. फोटोशूट बेतलं जीवावर रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या हनीमून दरम्यान ते फोटोशूटसाठी बीचवर पोहोचले; त्यानंतर वॉटर बाईक चालवताना फोटोशूट करण्याचं ठरलं. यावेळी तोल गेल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती देताना बालीचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, केवळ प्राथमिक तपास झाला आहे; त्यानुसार या जोडप्याला वॉटरबाईकवर फोटोशूट करायचे होते, त्यादरम्यान त्यांना तोल राखता आला नाही आणि दोघेही समुद्रात बुडाले. या दोघांनाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासाचा अहवाल आणि इतर अचूक तपशील अद्याप उघड झाले नाहीत. अधिक तपास सुरू आहे. वाचा - Online Mobile Games : मोबाईलवरून धर्मांतराचं पाकिस्तान कनेक्शन? अटक केलेल्या आरोपीचा धक्कादायक खुलासा ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, दोघांच्या कुटुंबीय आता मृतदेह चेन्नईला आणण्याची व्यवस्था करत आहेत. त्यांनी तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. इंडोनेशियातील भारतीय दूतावासाद्वारे मदतीची विनंती केली आहे. इंडोनेशिया ते चेन्नई थेट उड्डाण नसल्यामुळे, तामिळनाडूला परत आणण्यापूर्वी मृतदेह मलेशियाला नेले जातील. या घटनेमुळे विबुष्णियाचे कुटुंब राहत असलेल्या सेनेरकुप्पम गावात शोककळा पसरली आहे. नवविवाहित जोडप्याच्या अकाली निधनाने त्यांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.