प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 15 एप्रिल : उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्यांचं आगमन होतं. फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याला भारतामध्ये सांस्कृतिक महत्त्व आहे. भारतात मँगो शेक, आमरस आणि मँगो लस्सी यांसारखे पारंपरिक आंब्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. उन्हाळ्यात जवळपास प्रत्येकजण या पदार्थांचा आस्वाद घेतो. मात्र, या पारंपरिक पदार्थांव्यतिरिक्त आंब्यापासून काही ऑफबीट रेसिपीजही बनवता येतात. ‘द फूड अफेअर्स’ च्या संस्थापक सरिता बजाज यांनी आंब्याच्या काही ऑफबीट रेसिपीज शेअर केल्या आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मँगो तिरामिसू: एक प्रकारचं डेझर्ट असणारा हा पदार्थ तयार करणं म्हणजे अतिशय आनंददायी कृती आहे. त्यासाठी स्मूद आणि मलईदार मस्करपोन चीज आणि पिठीसाखर एकत्र करा. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत फेटा. त्यानंतर, फेटलेलं मस्करपोन आणि चिरलेल्या आंब्याच्या मिश्रणाचा लेडीफिंगर्सवर थर लावा. अंडीविरहित असलेल्या मँगो तिरामिसू या मिठाईचा आस्वाद घेण्यापूर्वी ती किमान दोन तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि सेट होऊ द्या.
आंबा चेन्ना पायस: हे एक स्वादिष्ट भारतीय डेझर्ट आहे. तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा पदार्थ अतिशय योग्य आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी चेन्ना (कॉटेज चीज) कंडेन्स्ड दुधात मिसळा आणि स्मूद मिश्रण तयार होईपर्यंत ते ढवळा. नंतर, त्यात आंब्याची प्युरी घाला आणि नीट ढवळून घ्या. सजावटीसाठी त्यावर काजू टाका. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर तो सर्व्ह करा. आंब्याचं आईस्क्रीम: हे डेझर्ट बनवण्यासाठी, हेवी क्रीम, कंडेन्स्ड मिल्क आणि व्हॅनिला एक्सट्रॅक्ट स्मूद होईपर्यंत मिसळा. नंतर, त्यात त्याच्या आंब्याची प्युरी घाला आणि चांगलं मिसळून घ्या. हे मिश्रण एका कंटेनरमध्ये ओता आणि ते सेट होईपर्यंत काही तास फ्रीजमध्ये ठेवा. ते बाहेर काढून हातानं चांगलं फेटून घ्या व ते पुन्हा फ्रीझ करा. शेवटी ताज्या आंब्याच्या कापांसह स्वादिष्ट मँगो आईस्क्रीम सर्व्ह करा. आंब्याची कोशिंबिर: स्वादिष्ट कोशिंबिर बनवण्यासाठी ताज्या आंब्याचे बारीक तुकडे करा आणि त्यात चिरलेली काकडी, लाल कांदा आणि कोथिंबीर मिसळा. त्यात लिंबाचा रस, मध, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला. हे मिश्रण चांगल्याप्रकारे एकत्र करून काही मिनिटे फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. त्यानंतर आंब्याची कोशिंबिर सर्व्ह करा. या कोशिंबिरीच्या प्रत्येक घासात तिखट-आंबड-गोड चवीचा आनंद मिळेल. दरवर्षी भाव खाणाऱ्या हापूस आंब्याचे दर यंदा कमी का आहेत? पाहा Video मँगो कोकोनट करी: केरळमधील लोकांची एक सर्वात लाडकी डिश आहे. हा पदार्थ म्हणजे पिकलेले आंबे, मलईदार नारळाचं दूध आणि सुगंधी मसाल्यांचं एक स्वादिष्ट मिश्रण आहे. ही डिश तयार करण्यासाठी, वरील सर्व घटक स्मूद होईपर्यंत एकत्र करा. नारळाचं दूध आणि मसाल्यांसह आंब्यातील गोड आणि तिखट चवीचं मिश्रण असलेली ही करी खाणाऱ्याला अविस्मरणीय अनुभव मिळतो. वाफाळत्या भातासह ही करी अधिक टेस्टी लागते. पुणे तिथे काय उणे! आता हप्त्यावर मिळतोय हापूस आंबा, किती असेल EMI? उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करून बघणं हा एक आनंददायी अनुभव ठरू शकतो. या शिवाय विविध प्रादेशिक रेसिपीज आणि स्वयंपाकाच्या तंत्रांसह वेगळा प्रयोग करण्याची संधीदेखील मिळते. तुमच्या दैनंदिन जेवणाच्या मेन्यूमध्ये आंब्याच्या या रेसिपीजचा समावेश केल्यानं तुमच्या आहारात वेगळेपण येऊ शकतं आणि त्याचबरोबर जीवनसत्त्वं आणि खनिजांचा डोसही शरीरात जाण्यास मदत होईल.