चंद्रकांत फुंदे, पुणे: उन्हाळा सुरु झाला की, आंबा प्रेमींना रसरशीत आंब्यांचे वेध लागतात. सुरुवातीला आंब्यांच्या किंमती या गगणाला भिडलेल्या असतात. यामध्ये हापूस आंब्यांविषयी तर मग बोलायलाच नको. मग काय आंबा प्रेमींना पैसे पाहून मनावर ताबा ठेवावा लागतो. पण पुणे तिथे काय उणे असं म्हणतात, ते उगाच नाही. पुण्यातील एका आंबा विक्रेत्यांने आंबा प्रेमींसाठी एक खास ऑफर आणली आहे. येथे चक्क EMI वर हापूस आंबा मिळतोय. तुम्हाला विश्वास बसत नाहीये ना? पण हे अगदी खरं आहे. गुरू सणस या व्यापाऱ्याने ही ऑफर सुरु केलीये. यामुळे आता आंबा प्रेमी पैशांची चिंता न करता मनसोक्त आंब्यांचा आनंद लुटू शकतात. पुण्यातील व्यापारी गुरू सणस यांची ही भन्नाट आयडिया आहे. ते चक्क EMI वर हापूस आंब्यांची विक्री करत आहेत. यासाठी त्यांनी पेटीएमशी कॉन्ट्रॅक्ट देखील केला आहे. गेल्या बारा वर्षांपासून गुरू सणस हे आंबे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. पुण्यातील सनसिटी रोड येथील आनंद नगर परिसरामध्ये त्यांचे दुकान आहे. या वर्षांपासून त्यांनी दुकानात ईएमआयवर आंबे विक्री करण्यास सुरुवात केलीये. यामध्ये ते नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस आंबा देत आहेत.
कशी सुचली ही आयडिया?
ही कल्पना कशी सुचली याविषयी बोलताना व्यावसायिक गुरू सनस म्हणाले की, लॉकडाउनमध्ये पाहिलं की, लोकांचा पगार कमी झाला होता. अनेकांना आंबे घेणं परवडत नव्हतं. अशा वेळी लोक हे मुलं हट्ट करत असुनही आंबे घेत नव्हते. तर काही लोक हे फक्त मुलांसाठी 4-5 आंबे घ्यायचे. म्हणूनंच वेगळं काही तरी करण्याचा विचार केला. मग पेटीएमची मशीन घेतली. त्यावेळी पेटीएमशी या विषयावर चर्चा केली. त्यांनी ईएमआय सुविधा सुरु करुन दिली.
जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की बनावट? प्लॉट खरेदी करण्यापूर्वी या ट्रिकने करा चेकहे कार्ड असणं आवश्यक?
हापूस आंबा ईएमआयवर खरेदी करायचा असेल तर काही अटी आहेत. त्या म्हणजे ईएमआयवर आंबे खरेदी करायचा असेल तर बँकेचे डेबिट अथवा क्रेडीट कार्ड आवश्यक आहे. संबंधित बँकच ग्राहकाला 3 ते 12 महिन्यांपर्यंत हप्ते बांधून देते. त्यांच्याकडून काही ग्राहकांनी आंबे देखील विकत घेतलेले आहेत. एका ग्राहकाने ३० हजारांचे आंबे खरेदी केले आहेत. आता त्यांना वर्षभरासाठी दरमहा 2500 रुपये हप्ता पडणार आहे.
ग्राहकांची प्रतिक्रिया काय?
आजवर आपण मोबाईल टीव्ही, फ्रीज, अशा घरगुती वापराच्या महागड्या वस्तु ईएमआयवर घेत होतो. पण पुण्यातील एका दुकानदाराने चक्क हप्त्यावर हापूस आंबा उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळालाय. तसंच एकदाच ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार नसल्यामुळे ग्राहकही आनंदात आहेत.