नुपूर पाटील, प्रतिनिधी
मुंबई, 24 मार्च : गुढीपाडव्याचा सण नुकताच झालाय. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच फळांचा राजा आंब्याचं आगमन झालंय. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सर्वत्र आंब्याचा सुंगध दरवळतोय. आंब्याच्या देशभरात अनेक जाती आहेत. या सर्व जातीमध्ये हापूस आंब्याचा मान हा सर्वाधिक आहे. हापूसची किंमत यंदा नेहमीपेक्षा कमी असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सिझनच्या सुरुवातीलाच हापूसची किंमत का घसरली? हाच ट्रेंड यापुढेही कायम राहणार का? असे प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्याची उत्तरं आम्ही देणार आहोत.
का घसरली किंमत?
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या वर्षी गुढी पाडव्याला आंब्याच्या 15000 पेट्या दाखल झाल्या होत्या. यावर्षी त्याच्या चौपट म्हणजे 60000 पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. देवगड, रत्नागिरी, राजापूर, वेंगुर्ला, मालवण,या भागातून हापूस आंब्याच्या पेट्यांची संख्या यामध्ये मोठी आहे. आवक वाढल्यानं हापूसचे दर कमी झाले आहेत.
गेल्या वर्षी मान्सून आणि फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत तीव्र उष्णतेचा समावेश होता. त्यामुळे यावर्षी आंब्याचे पीक चांगले झाले. अवकाळीचा फटका कोकणाला जास्त प्रमाणात बसला नाही. एका पेटीत प्रत्येकी दोन ते चार डझन हापूस आंबे आहेत. प्रत्येक पेटीचा आकार हा त्यामधील आंब्याचा दर्जा आणि आकारानुसार बदलतो. 850 ते 2,200 रुपये प्रती डझन असा या आंब्याचा दर आहे.
हापूस आंब्याचे सांगलीत आगमन, पाहा एका पेटीला किती मिळाला भाव
अन्य आंब्यांचे दर काय?
एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या भागातूनही आंबे आले आहेत. या आंब्याच्या पेटीची किंमत 1500 ते 4500 रुपयांच्या दरम्यान आहे. कर्नाटकातील बदामी आंबा 80 रुपये किलो प्रमाणे विकला गेला.
तोतापुरी 40-50 रुपये प्रति किलो, तर लालबाग आंब्याची किंमत 60 रुपये ते 80 रुपये प्रति किलो आहे. सध्या आंब्याचे आवक वाढली असली तरी एप्रिल महिन्यात मात्र आंब्याची कमतरता भासणार आहे. डिसेंबर- जानेवारी महिन्यात आंब्याची झाड फुटली नसल्यानं ही कमतरता भासेल. पण, मे महिन्यात मात्र आंब्याची आवक पुन्हा वाढेल, असा अंदाज एपीएमसी मार्केटमधील व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Mumbai, Ratnagiri Hapus