कोल्हापूर, 10 नोव्हेंबर: कोल्हापुरातील सीपीआरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी पोलीस आणि डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळे एका कुटुंबाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. आपलाच नातेवाईक मरण पावल्याचं समजून एका कुटुंबानं एका भलत्याच व्यक्तींवर रविवारी अंत्यसंस्कार केले आहेत. पण दुसऱ्या दिवशी सोमवारी ‘तुमचा रुग्ण जिवंत आहे’ असा फोन रुग्णालयातून आल्यानंतर नातेवाईकांना धक्काच बसला आहे. पण ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती व्यक्ती नेमकी कोण हा प्रश्न अद्याप कायम आहे. सीपीआरने याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केला नाही. त्यामुळे सीपीआर प्रशासनाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर जोशी नगरातील रहिवासी असणाऱ्या नारायण सदाशिव तुदिगाल (वय-35) यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. हेही वाचा- एका चुकीमुळे अडीच कोटींचं नुकसान; शेतकऱ्यांची 25 एकरावरील द्राक्षबाग झाली नष्ट दरम्यन, रविवारी नारायण यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून नातेवाईकांना देण्यात आली. नारायण यांच्या मृत्यूची माहिती कळताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. तर गल्लीतही नातेवाईकांची रडारड सुरू केली. यावेळी सुरू असलेल्या गडबडीत संबंधित मृतदेह आपल्याच माणसाचा आहे का? याची कोणीही खात्री केली नाही. पोलीस किंवा सीपीआरमधून कोणीतरी फोनवरून नातेवाईकांना ही माहिती दिली होती. तसेच रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. हेही वाचा- कारमध्ये हवा भरणं पडलं एक लाखाला; हिंगोलीतील शिक्षकासोबत घडला भलताच प्रकार पण सोमवारी पुन्हा रुग्णालयातून फोन आला आणि तुमचा रुग्ण जिवंत असल्याची माहिती दिली. ही बातमी ऐकून कुटुंबीयांचा आनंदाचा पारावर उरला नाही. पण रविवारी ज्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ती व्यक्ती कोण होती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शवविच्छेदन करण्याआधी पोलिसांनी जो पंचनामा केला, त्यावर तुदिगाल याचं नाव लिहिण्यात आलं होतं, त्यामुळे डॉक्टरांनी कोणतीही खातरजमा केली नाही, असं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस आणि डॉक्टरांचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे.