मुंबई, 25 जानेवारी : कोरोनानंतरच्या लॉकडाउननंतर आता सगळीकडे लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. मराठी कलाविश्वातील जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पाडला. मराठमोळ्या, पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधी, कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या हळद, मेहेंदीचे फोटोही दोघांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
गेल्या कित्येक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची मोठी चर्चा होती. 24 जानेवारी रोजी सिद्धार्थ मिताली लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिज्ञा भावे, भूषण प्रधान, पूजा सावंत, उमेश कामत आणि इतरही अनेक कलाकार उपस्थित होते.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या 2019 मध्ये साखरपुडा झाला होता. 2 - 3 वर्षांपासून ते रिलेशनमध्ये होते. त्यांच्या केळवणाचे फोटोही व्हायरल झाले होते. सध्या मिताली आणि सिद्धार्थ आपआपल्या मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.