मुंबई, 12 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये रामायण (Ramayana) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं बजेट 300 कोटी असून याचं चित्रीकरण 3D मध्ये होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सोशल मीडियामध्येही बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मधु मंटेना (Madhu Mantena) हे करणार असून मुख्य भूमिकेत बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) दिसणार अशी चर्चा होती. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात मुख्य भूमिकेत ऋतिक रोशनऐवजी दक्षिणात्य अभिनेता महेश बाबूची एन्ट्री होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी दक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचा विचार केला जात आहे. त्यामुळे तो रामायण या बीग बजेट चित्रपटात रामाची व्यक्तिरेखा साकारताना दिसू शकतो. तर दीपिका पादुकोण सीतेची भूमिका निभावणार आहे. दिग्दर्शक मधु मंटेना यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे या चित्रपटात स्टार कलाकारांना संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी महेश बाबूसोबत बोलणी सुरू आहेत. महेश बाबूला या चित्रपटाची पटकथा खूपच आवडली असून त्यांनी अद्याप होकार दर्शवला नाही. या पार्श्वभूमीवर ऋतिक रोशनला मुख्य भूमिकेतून का हटवलं ? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. कारण या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या होत्या.
मधु मंटेना यांना स्टार कलाकार घेण्यासाठी Kwaan या एजन्सीची मदत मिळत आहे. असंही म्हटलं जात आहे की, या चित्रपटात व्हिलनची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी ऋतिकने होकार दर्शवला आहे. त्यामुळे तो मोठ्या पडद्यावर आपल्याला रावणाच्या भूमिकेत दिसू शकतो. पण अद्याप या चित्रपट निर्मात्यानी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सध्या रामायणावर अधारित दोन चित्रपटांवर काम सुरू आहे. एक चित्रपट ‘आदिपुरूष’ आणि दुसरा म्हणजे मधु मंटेना यांचा रामायण.