आशिष महर्षी, मुंबई, 03 मार्च: प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आता बॉलिवूडकर (Bollywood) असल्याचं पाहायला मिळतं आहे. इन्कम टॅक्स विभागाने बॉलिवूडमधील काही महत्त्वाच्या कलाकार आणि दिग्दर्शकांवर धाड टाकल्याची माहिती समोर येते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तापसी पन्नू (Tapasee Pannu), अनुराग कश्यप (Anurag Kashyap), विकास बहल (Vikas Bahl) यांच्या विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. मुंबईतील विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. फँटम फिल्म्स संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे.
मुंबईसह पुण्यातही या कलाकारांची मालकीच्या असणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. एकूण 22 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. CNN-News18 चे प्रतिनिधी आशिष महर्षी यांनी अशी माहिती दिली आहे की, या लोकांविरोधात कथित स्वरुपात मोठ्या प्रमाणात आयकर चोरी केल्याचा आरोप आहे. मुंबई आणि शहराबाहेरील काही भागात ही छापेमारी करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीच्या प्रकरणात आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. (हे वाचा- ‘चला भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया’; Covid Vaccine घेत कमल हासन यांचा टोला ) News18 India चे प्रतिनिधी आनंद तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, फँटम फिल्म्सच्या विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. याशिवाय आयकर विभागाने एका निवेदनात असे म्हटले आहे की मुंबईत दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.