मुंबई, 01 मार्च: गेल्या दोन दिवसांपासून बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रकृती काहीसी ढासळली आहे. दरम्यान त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर प्रथमचं अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी जीवन आणि मृत्यूमध्ये झगडणाऱ्या मानवाच्या आयुष्यासंबंधी एक बहुमोल संदेश दिला आहे. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अगदी कमी शब्दांत त्यांच्या ब्लॉगवर माहिती दिली होती. यावेळी त्यांनी लिहिलं होतं की, ‘मेडीकल कंडीशन… सर्जरी…जास्त काही लिहू शकतं नाही.’ त्यांच्या या ब्लॉगनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. पण बॉलीवूडच्या महानायकाने शस्त्रक्रियेनंतर एक नवीन फोटो शेअर केला आहे. ज्यातून त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
यानंतर नुकतंच त्यांनी एक ट्वीट देखील केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून जीवन आणि मृत्युच्या मध्ये झगडणाऱ्या समस्त मानवी आयुष्याला उद्देशून बहुमोल संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘माणसाचं आयुष्य हा एक दयाहीन गुंता आहे. त्याचं कोणाकडेही उत्तर नाही.’ त्यांचं हे ट्वीट आता चांगलंच व्हायरल होतं आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
हे ही वाचा - महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, शस्त्रक्रियेबद्दल दिली माहिती 78 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्यावर बॉलीवूड इंडस्ट्रीने कोट्यावधी रुपये लावले असल्याची माहिती समजत आहे. वयाच्या या टप्प्यावरही अमिताभ यांच्याकडे अनेक चित्रपटांची कामं होत. यामध्ये अनेक बीग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. झुंड, चेहरे, बटरफ्लाय, मेडे आणि ब्रह्मास्त्र असे बहुचर्चित चित्रपटांत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. यातील काही चित्रपटांची अद्याप शुटींग पूर्ण झाली नाही. अशाच अमिताभ बच्चन यांची प्रकृती ढासळणे, अनेक बॉलीवूडकरांसाठी नकारात्मक बातमी आहे.