मुंबई, 2 फेब्रुवारी : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणी विविध प्रकारे चौकशी सुरू आहे. आतापर्यंत एनसीबीकडून अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. आता NCB कडून सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आणि माजी असिस्टेंट डायरेक्टर ऋषिकेष पवार याला ताब्यात घेण्यात आलं आहे. एनसीबीकडून ऋषिकेषची चौकशी सुरू आहे. ऋषिकेष पवार अनेक दिवसांपासून फरार होता. एनसीबीकडून ऋषिकेषचा शोध सुरू होता. याआधीही ऋषिकेष पवारची ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने चौकशी केली होती. गेल्या वर्षी बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी चौकशीवेळी एका ड्रग्ज सप्लायरने ऋषिकेष पवारचं नाव घेतलं होतं.
सुशांतच्या वांद्र्येतील घरी काम करणाऱ्या दीपेश सांवतनेही एनसीबी चौकशीत ऋषिकेषचं नाव घेतलं होतं. तसंच त्याने ऋषिकेष पवार सुशांतला ड्रग्ज सप्लाय करत असल्याचा आरोपही केला होता. कित्येक दिवसांपासून फरार असलेल्या ऋषिकेषची आता पुन्हा एकदा एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी एसीबीने आतापर्यंत अनेक कलाकारांची चौकशी केली आहे. दीपिका पदुकोन, सारा अली खान, अर्जुन रामपाल, कॉमेडियन भारती सिंह यांसह अनेकांची चौकशी करण्यात आली आहे.