मुंबई,20 फेब्रुवारी : अभिनेता सोनू सूदने उत्तराखंडमधील चमोली त्रासदी येथील चार मुलींना दत्तक घेत एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्यामुळे सर्वांकडून सोनूच मोठं कौतुक होत आहे. चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार गडगंज पैसा कमावत असतात. त्यामुळे त्यांची लाइफस्टाइलसुद्धा तितकीच हायफाय असते. त्यांना सर्वसामान्य जनतेबद्दल काही सुखदु:खच नाही असं बऱ्याच लोकांना वाटत असत. मात्र चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांना सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान आहे. बरेच कलाकार आपल्या संपत्तीचा मोठा वाटा समाजकार्यासाठी वापरतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे सोनू सूद. सोनू सूद हा दक्षिणात्य चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. सोनू जितका चांगला कलाकार आहे तितकाच चांगला माणूससुद्धा आहे. हे त्यानं वेळोवेळी दाखवून दिलं आहे. गेली वर्षभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या काळात अनेकांना आर्थिक मदतीची गरज होती. या काळात तर सोनू अनेकांसाठी देवच ठरला होता. सोनुने अनेकांना मदतीचा हात देऊ केला होता.
यातून त्याची सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असलेली तळमळ दिसून आली. सोनूने आपलं मदतकार्य असच चालू ठेवलं आहे. सोनूने चार मुलींना दत्तक घेत समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवलाय. या चार मुली उत्तराखंडमधील आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये नैसर्गिक आपत्ती आली होती. हिमकडा कोसळून नदीला महापूर आला. या जलप्रलयात जोशीमठ येथील ऋषीगंगा हा प्रकल्प वाहून गेला होता. तर यात काम करणारे 100 ते 150 मजूर वाहून गेले होते. मोठ्या प्रमाणात झालेल्या या जीवितहानीत चमोली त्रासदीचा इलेक्ट्रिशिअन असलेला आलम सिंह पुडीर हा व्यक्तीदेखील वाहून गेला होता. या व्यक्तीला चार मुली आहेत. जलप्रलयात मृत्यू झालेल्या आलमच्या चारही मुलींना सोनुने दत्तक घेतलं आहे. सोनुने पुन्हा एकदा समाजकार्य करत गरजूंना मदतीचा हात दिला आहे.
सोनुने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर स्वतः याबाबत माहिती दिली आहे. या चार मुलींचा फोटो शेअर करत सोनुने, ‘आता हे कुटुंब माझं आहे. यांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची जबाबदारी आता माझी आहे.’ असं लिहिलं आहे. सोनूच्या या निर्णयाने आलम सिंहच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबासाठी सोनू देवदूतासारखा धावून आला आहे. सोनूच्या या कार्यामुळे सर्वच स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे. तर सामाजिक बांधिलकी जपणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं सोनुने मीडियाशी बोलताना म्हंटल आहे.