प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी सक्षम गोयल
नरेश पारीक, प्रतिनिधी चूरू, 25 जून : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. मात्र, त्यापैकी अगदी मोजकेच ही परीक्षा पास होतात. काहीच जण क्लास लावतात, तर काही जण सेल्फ स्टडीवर भर देऊन, पार्ट टाईम नोकरी करुन आपले नशीब आजमावत असतात. यातील अनेकवेळा प्रयत्न करुनही काही जणांना यात यश येत नाही. तर काही जण असे असतात जे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतात. आज आपण अशाच एका तरुणाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत, ज्याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. सक्षम गोयल असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. सक्षम गोयल हे आता चूरू येथे आयएएस प्रशिक्षणार्थी पदावर कार्यरत आहेत. यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या लाखो तरुणांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. यश मिळवण्यासाठी कोणत्याही कोचिंग सेंटरची आवश्यकता हवीच असे नाही. तर मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर यश मिळते, असे ते सांगतात. सक्षम गोयल हे उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा येथील रहिवासी आहेत.
त्यांनी 2015 मध्ये सेंट कॉनराड्स इंटर कॉलेजमधून 10वी उत्तीर्ण केली आणि 2017 मध्ये वसंत कुंज, दिल्ली येथील डीपीएसमधून 12वीचे शिक्षण पूर्ण केले. गोयल सांगतात की, त्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही. फक्त ऑनलाइन तयारी केली. ते रात्री अभ्यास करायचे आणि दुपारी झोपायचे आणि संध्याकाळी खूप फिरायचे. यासोबतच त्यांना राजकारणातही रस आहे. त्यामुळेच त्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय निवडले. सक्षम गोयल यांनी सांगितले की, 2020 मध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षात त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. पण फॉर्म भरण्याची तयारी केली तेव्हा त्यांचे वय कमी होते. त्यामुळे त्यांना त्यावेळी फॉर्म भरता आला नाही. पण नंतर पुढच्या वर्षी फॉर्म भरला आणि पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले. त्यांची मुलाखत ही अर्धा तास चालली. मुलाखतीदरम्यान त्यांना प्रथम विचारण्यात आला की, तुमच्या नावाचा अर्थ काय आहे? त्यांना एकूण 35 प्रश्न विचारण्यात आले होते. पण तरी त्यांनी न डगमगता त्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि शेवटी या परीक्षेत बाजी मारत 27 वी रँक मिळवली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी सक्षम गोयल सांगतात की, त्यांच्या कुटुंबात आधीच अनेक शासकीय सेवेत आहेत. यासोबतच अनेक माजी विद्यार्थी महाविद्यालयात येऊन व्याख्याने देत असत, त्यामुळे ही नोकरी खूप चांगली आणि सुरक्षित नोकरी आहे, असे वाटायचे. तुम्हाला तरुण कलेक्टर व्हायचे आहे असा विचार करून कधीही तयारी करू नका. ही तुमची आवड आहे का, याचा आधी विचार करा. कारण या परीक्षेत बरीच अनिश्चितता आहे, असा सल्लाही ते देतात. मला नोकरी मिळेल की नाही हे देखील माहित नव्हते, असेही त्यांनी सांगितले.