पवन सिंह कुंवर/बाजपूर, 18 फेब्रुवारी : असे काही लोक आहेत जे प्राण्यांवर इतकं जीवापाड प्रेम करतात की त्यांना रस्त्यावर कुठेही अनाथ, भटके प्राणी दिसताच त्यांनाही आपल्या घरी आणतात. त्यांना राहायला आपल्या घराचं छत, खायला देतात, त्यांची काळजी घेतात. एका व्यक्तीनेही रस्त्यावरील अशाच भटक्या श्वानाच्या अनाथ पिल्लाला घरी आणलं. त्यानंतर असं काही घडलं की त्याच्या बायकोचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. बल्ली गावातील सूरज सैनी बुधवारी रस्त्यावरील श्वानाच्या पिल्लाला घरी घेऊन आला होता. हे पिल्लू अनाथ होतं. पण हे पिल्लू त्याच्या बायकोच्या मृत्यूचं कारण ठरेल याचा त्याने विचारही केला नव्हता.
बन्नाखेडा पोलीस ठाण्यातील एसएसआय विक्रम सिंह धामी यांच्या हवालानुसार प्राथमिक तपासणीत मिळालेल्या माहितीनुसार, सूरज आणि उर्मिलामध्ये वाद झाला होता. श्वानाच्या पिल्लावरूनच नवरा-बायकोत भांडणं झालं. त्यानंतर रागात उर्मिलाने धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं आहे. तिने घरात गळफास घेतला.
हे वाचा - मेहुणीसोबत अफेअर, लग्न करण्यासाठी Valentine Day ला पत्नीसोबत पतीचं भयानक कांड
पण पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच तिचा मृतदेह कुटुंबाने खाली काढून ठेवला होता. दरम्यान तिच्या भावाने ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा आरोप केला आहे.
बैरहनीत राहणारा उर्मिलाचा भाऊ दिनेशने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याने तिच्या नवऱ्यासह सासरच्या पाच जणांविरोधात तक्रार केली. ही आत्महत्या नसून हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप त्याने केला आहे. दिनेशने सांगितलं, माझी बहीण उर्मिलाचं लग्न सूरजशी सव्वा वर्षापूर्वी झालं. लग्नात त्याला 20 हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली. लग्नानंतर ते लोक बुलेट बाईक मागत होते आणि उर्मिलाला छळत होते.
हे वाचा - लग्नाच्या 6 महिन्यातच पती-पत्नीमध्ये वाद, प्रकरण कोर्टात अन् घडलं भयानक
दिनेशने आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान आरोपांनुसार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.