गाझियाबाद, 18 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंध, कौटुंबिका वादातून हत्या आणि आत्महत्येच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवार-शनिवारी रात्रीची आहे. खून करून पती फरार झाला आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडितेच्या कुटुंबीयांकडून सर्व माहिती घेतली. त्याचवेळी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. तसेच पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत. गाझियाबाद शहरातील आर्य नगर परिसरात 22 वर्षीय तरुणीची पतीने वार करून हत्या केली. वंशिका कश्यप असे मृत तरुण पत्नीचे नाव आहे. गाझियाबादच्या विजयनगर भागात राहणाऱ्या नरेशसोबत तिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर 6 महिने झाले आणि तेव्हापासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे वंशिका पतीपासून वेगळ्या घरात राहत होती आणि या वादामुळे दोघांमध्ये कोर्टात केसही सुरू होती. ‘आजतक’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा नरेश पत्नी वंशिका हिला भेटण्यासाठी सासरच्या घरी पोहोचला आणि यावेळी त्याने तिला आपल्यासोबत घरी परतण्यास सांगितले. मात्र, वंशिकाने पती नरेशला नकार दिला. यानंतर दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. नरेशने वंशिकाला घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत नेले आणि तिला एकटीने बोलण्यास सांगून तेथे त्याने वंशिकाच्या पोटावर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर जखमी वंशिकाला तिथेच सोडून तो पळून गेला. हेही वाचा - मोबाइलचं असं वेड की लेकाने आईलाच संपवलं; पुण्यातील चीड आणणारी घटना वंशिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती - बराच वेळ वंशिका खाली न आल्याने घरातील सदस्य खोलीत पोहोचले. यावेळी वंशिका रक्तबंबाळ होऊन पडली होती. यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेतली. मृत वंशिकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तिचा पती नरेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीपी सिटी अंशू जैन यांनी सांगितले की, पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.