उत्तर मेलबर्न, 25 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) जंगलामध्ये सापडलेला मेंढा (नर मेंढी) सध्या जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. जंगलामध्ये इकडे-तिकडे धावणाऱ्या या मेंढ्याला पाहिल्यावर स्थानिक नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण हा मेंढा एखाद्या लोकरीच्या गोळ्यासारखा दिसत होता. या मेंढ्याला त्यांनी बराक (Baarack) असे नाव दिले. बराकला रेस्क्यू करण्यात आले असून त्याच्या शरीरावरील लोकर काढण्यात आली. त्याच्या शरीरावरुन जवळपास 35 किलो लोकर (fleece) निघाली.
मिशन फार्म सेंचुरीच्या (Mission Farm Sanctuary) काइल बेहरेन्ड यांच्या म्हणण्यानुसार, एका स्थानिक व्यक्तीला हा मेंढा दिसला. त्याने तत्काळ एडगरच्या मिशन फार्म सेंचुरीला संपर्क केला. उत्तर मेलबर्नपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हिक्टोरिया जंगलामध्ये बराक सापडला. गेल्या 5 वर्षांपासून त्याच्या शरीरावरची लोकर न काढल्यामुळे ती वाढत गेली असल्याचे सांगण्यात आले आहे.
काइल बेहरेन्ड यांनी पुढे सांगितले की, 'बराककडे पाहिल्यावर असे दिसून येते की त्याचा कुणीतरी मालक असावा. कारण बराकच्या कानाला टॅग लावण्यात आला होता. पण त्याच्या चेहऱ्याभोवती आलेल्या दाट लोकरीमुळे तो फाटलेला दिसत आहे. तसंच, 'कमीत कमी एका वर्षाने तरी मेंढीची लोकर काढली पाहिजे. नाही तर लोकर वाढतच जाते. बराकच्या शरीरावरुन 35.4 किलोग्रॅम लोकर काढण्यात आली.'
(हे पहा : याला म्हणतात Real Hero, चिमणीचं घरटं वाचवण्यासाठी शेतकऱ्याने सोडलं स्वत:चं शेत )
'अंगावरील लोकर वाढल्यामुळे बराकचे वजन खूप कमी झालं होतं. शरीरावर लोकर वाढल्यामुळे तो व्यवस्थित चालू सुद्धा शकत नव्हता. तसंच तोंडावर मोठ्याप्रमाणात वाढलेल्या लोकरीमुळे त्याला समोरचं व्यवस्थित दिसत सुद्धा नव्हतं. सध्या बराक एडगर मिशनमधील इतर रेस्क्यू केलेल्या मेंढ्यांसोबत राहत आहे.', असं काइल बेहरेन्ड म्हणाले.
जर बराकची लोकर काढली गेली नसती तर उन्हाळ्यामध्ये त्याला खूप त्रास होऊन त्याचा मृत्यू झाला असता, असं देखील सांगितले जात आहे. याआधी 2015 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अशाच प्रकारचा एक मेंढा सापडला होता. त्याच्या शरीरावरुन 41 किलो लोकर काढण्यात आली होती. दरम्यान, सध्या बराक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.