मुंबई 25 फेब्रुवारी: प्रसिद्ध उद्योगपती, महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर (social media) खूप सक्रीय असतात. त्यांना आवडलेला एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या प्रत्येक व्हिडिओला युजर्सकडून खूप चांगली पसंती मिळत असते. यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एका शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा शेतकरी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतातील चिमणीचं घरटं दाखवताना दिसत आहे. कापणी करताना या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये चिमणीचं घरटं आणि अंडी (sparrow nest and eggs) दिसली. चिमणीचं घरटं वाचवण्यासाठी या शेतकऱ्याने शेतातील काही भाग सोडून दिला. आनंद महिंद्रा यांनी या शेतकऱ्याचं कौतुक करत त्याला 'पर्यावरण नायक' (Environmental Hero) असं म्हटलं आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये असं सुद्धा लिहिलं आहे की, 'ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की आपण सर्वांनी या ग्रहावरील आणि आपल्या सहवासातील लोकांशी कसं वागावं.'
This man is an environmental hero. And this story tells us how we all need to treat this planet and our fellow inhabitants... https://t.co/er9uXlQ5UR
— anand mahindra (@anandmahindra) February 24, 2021
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटिझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही युजर्सनी पक्षी आणि भटक्या प्राण्यांना आपण कशाप्रकारे मदत करु शकतो याबाबत कल्पना सुचवल्या आहेत. आणखी काही युजर्सनी आपला देश आणि पर्यावरणाचे खरे नायक शेतकरी असल्याचं म्हटलं आहे. तर एका युजरनं सांगितलं की, 'प्रत्येक शेतकरी जर त्याला आपल्या शेतामध्ये काही गोष्ट आढळली तर तो असंच करतो. ही घटना खूप सामान्य आहे. हे मी माझ्या आयुष्यात बरेचदा पाहिलं आहे. मी माझ्या शेतामध्ये मधमाश्यांसाठी असाच काही भाग सोडला आहे.'
अवश्य पाहा - कधी मिळणार कोरोना लस? सोनम कपूरच्या प्रश्नाचं तुमच्याकडे आहे का उत्तर?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा शेतकरी तामिळनाडूच्या कुंभकोणमजवळील तंजावूर या गावामध्ये राहतो. जे. रंगनाथन (J. Ranganathan) असं या शेतकऱ्याचं नाव असून तो 40 वर्षांचा आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा रंगनाथन यांच्या शेतातील पिकांचे 120 दिवसांचं चक्र पूर्ण झालं होतं आणि ते कापणीसाठी तयार होते. शेतामध्ये कापणी सुरु असताना रंगनाथन यांना चिमणीचं घरटं दिसलं. त्यांनी ताबडतोब कापणी मशिन चालवणाऱ्याला थांबण्यास सांगितलं आणि घरटं तपासलं.'
रंगनाथन यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांना या घरट्यामध्ये चिमणीची चार अंडी दिसली. त्यांना या चिमणीच्या घरट्याला नुकसान पोहचवायचं नव्हतं. घरटं वाचण्यासाठी त्यांनी आपल्या शेतातील काही भाग सोडून दिला. यासोबत त्यांनी घरट्याला काही नुकसान पोहचू नये यासाठी पिकाला चारही बाजूने काठ्या बांधल्या. तसंच घरटं आणि अंडी दोन्ही सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करुन घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Real heroes, Shocking viral video, Tech Mahindra, Viral video on social media