रुपेश कुमार भगत, प्रतिनिधी गुमला, 17 जून : आपल्या भारतात मुलींसाठी लग्नाचं कायदेशीर वय 18 वर्षे, तर मुलांसाठी लग्नाचं कायदेशीर वय 21 वर्ष इतकं आहे. मात्र असं असतानाही अनेक ठिकाणी अल्पवयीन मुला-मुलींचं लग्न लावून दिलं जातं, तर अनेक अल्पवयीन मुलं-मुली स्वतःच्या मर्जीनेच घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न करतात. झारखंडमधील अशाच एका जोडप्याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीला पोलिसांनी बाल कल्याण समितीकडे सोपवलं असून नीरज कुमार या तिच्या 22 वर्षीय प्रियकराला तुरुंगात धाडलं आहे. बिहारच्या परारिया गावातून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं. एका आठवड्यापासून दोघं एकत्र राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गंगटा गावचा रहिवासी नीरज आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी या दोघांची फेसबुकवरून ओळख झाली होती. काहीच दिवसांत त्यांची मैत्री अतिशय घट्ट झाली आणि बघता बघता तिचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. मात्र नीरजने झारखंडच्या गुमला भागात जाण्यास नकार दिला, त्यामुळे मुलीने गुमलाहून बिहारला यायची तयारी केली. ती आल्यावर नीरज तिला त्याच्या घरी घेऊन गेला नाही, तर तो तिच्यासोबत जवळच्या परारिया गावात राहू लागला. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
तर दुसरीकडे, आपली 14 वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिचं अख्ख कुटुंब चिंतेत होतं. ही मुलगी घरातून कपडे, पैसे आणि बँकेचं पासबुक सोबत घेऊन गेली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस तपासातून ती बिहारच्या परारिया गावात असल्याचं कळलं. त्यानंतर गुमला पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेतलं. Fruit Benefits : ‘या’ हिरव्या फळाचं नाव माहितीये? फायदे वाचला तर चकित व्हाल! दरम्यान, नीरज आणि अल्पवयीन मुलगी जानेवारी महिन्यात एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आठवड्याभरापूर्वी मुलीने आपलं घर सोडलं. याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार नीरजला अटक करण्यात आली असून मुलीला बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आलं आहे.