यमुंबई, 06 ऑगस्ट: मानवतेच्या इतिहासातील एक अत्यंत वाईट म्हणजे 6 ऑगस्ट 1945. याच दिवशी अमेरिकेने (USA) जपानमधल्या (Japan) हिरोशिमा (Hiroshima) या शहरावर अणुबॉम्ब (Atomic Bomb) टाकला होता. त्यात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला होता. जपान तर यामुळे बेचिराख झालाच, पण सारं जगच भीतीने थरथरलं. त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी जपानमधल्याच नागासाकी (Nagasaki) या शहरावरही अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला. तिथेही मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला. त्या बॉम्बमुळे होत असलेल्या किरणोत्साराचे (Radiation) दुष्परिणाम पुढच्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागले.
या अत्यंत दुर्दैवी घटनेला 76 वर्षं झाली असली, तरी त्या वाईट स्मृती कधीच पुसल्या जाणार नाहीत. या दोन अणुबॉम्बनंतर आशियात दुसऱ्या जागतिक महायुद्धाची समाप्ती ही केवळ औपचारिकताच राहिली. जपानी सैन्याने पीछेहाट सुरू केली. एकाच आठवड्यात जपानने मित्रदेशांच्या आघाडीपुढे आत्मसमर्पण केलं.
हे वाचा-अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 24 तासांत 300 तालिबानींचा खात्मा
सहा ऑगस्ट 1945 रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास अमेरिकेच्या अॅनोला गे या के बी 29 बॉम्बरच्या माध्यमातून जपानमधल्या हिरोशिमा शहरावर लिटिल बॉय (Little Boy) नावाचा अणुबॉम्ब टाकला. त्यातून 20 हजार टनांहून अधिक TNT एवढी प्रचंड ऊर्जा उत्सर्जित झाली. त्या वेळी त्या शहरातले अनेक नागरिक कामावर जात होते. मुलंही शाळेत पोहोचली होती. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टाकलेल्या या बॉम्बने 80 हजार जणांचा मृत्यू झाला. तेवढ्याच व्यक्ती जखमी झाल्या.
त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी फॅट मॅन (Fat Man) नावाचा अणुबॉम्ब जपानच्याच नागासाकी शहरावर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टाकण्यात आला. त्यात 40 हजार जण मारले गेले. त्या वेळी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून असं दिसून आलं, की तो बॉम्ब एका दरीत कोसळला. त्यामुळे हिरोशिमाच्या तुलनेत नागासाकीवरच्या बॉम्बमुळे कमी नुकसान झालं. त्याचा परिणाम 1.8 चौरस मैल एवढ्या परिसरापुरताच मर्यादित राहिला.
हे वाचा-पाकिस्तानात समाजकंटकांकडून गणपती मंदिरात तोडफोड, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब का टाकले, यावर अनेक मतं मांडली जातात. 1945 साली जपान आणि अमेरिकेदरम्यान तणाव खूप वाढला होता. जपानने इंडोचायना भागावर कब्जा करण्याच्या दिशेने रणनीती आखली. त्यामुळे अमेरिका नाराज झाली होती. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हॅरी ट्रूमन (Hary Truman) यांना अणुबॉम्बच्या वापराचे अधिकार देण्यात आले होते, जेणेकरून जपानला दुसऱ्या जागतिक महायुद्धात आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं जाऊ शकेल.
ट्रूमन यांनी जपानला इशारा दिला होता, की जपानने माघार घेतली नाही, तर जपानच्या कोणत्याही शहराला पूर्णतः बेचिराख करण्याची क्षमता अमेरिकेकडे आहे. जपानने आमच्या अटी मानल्या नाहीत, तर त्यांनी आमच्याकडून केल्या जाणाऱ्या विध्वंसाचे साक्षीदार होण्याची तयारी करावी, असं ट्रूमन यांनी सांगितलं होतं; मात्र जपानने तरीही माघार घेतली नाही. त्यानंतर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला आणि 6 ऑगस्टला हिरोशिमा आणि 9 ऑगस्टला नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकले.
हे वाचा-शक्तीशाली विस्फोटानं काबुल पुन्हा हादरलं; मदतीसाठी अफगाणिस्तानचं भारताला साकडं
यामागची आणखीही काही कारणं सांगितली जातात. इतिहासकार गार अॅलपरोजित्झ यांनी 1965 साली लिहिलेल्या आपल्या पुस्तकात म्हटलं आहे, की जपान तर त्या वेळी हरण्याच्याच स्थितीत होता; पण अमेरिका दुसऱ्या महायुद्धानंतर (Second World War) सामर्थ्याच्या बाबतीत सोव्हिएत संघाला (Soviet Union) मागे टाकू इच्छित होता. त्यामुळे जपानच्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने जणू शक्तिप्रदर्शनच केलं. हे कारण त्या वेळी सोव्हिएत संघाकडूनही सांगण्यात येत होतं, असंही सांगितलं जातं.
हिरोशिमा आणि नागासाकी हीच दोन शहरं यासाठी निवडण्याचीही काही कारणं होती. ज्या शहरांवर बॉम्ब टाकला, तर त्याचे जास्तीत जास्त दुष्परिणाम होतील, अशी शहरं निवडायला हवीत, असं ट्रूमन यांचं मत होतं. जपानच्या युद्धसामर्थ्यावर त्याचा परिणाम व्हायला हवा, असा विचार त्यामागे होता. हिरोशिमा हे जपानचं सातव्या क्रमांकाचं सर्वांत मोठं शहर होतं. सैन्याची सर्वांत मोठी भांडारं त्या शहरात होती. तसंच चुगोकु सेनेचं ते मुख्यालयही होतं. या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर दुसरं जागतिक महायुद्ध समाप्त झालं. या अणुबॉम्बनी मानवतेवर लागलेला कलंक कधीही पुसला जाणार नाही. युद्धाचे दुष्परिणाम किती भीषण असू शकतात, याची जाणीव ही घटना सातत्याने करून देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.