नवी दिल्ली 13 जुलै: आजच्या जगाचं चलनवलन तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विश्वातल्या दिग्गज कंपन्यांवर आजच्या जगातल्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या दिग्गज कंपन्यांपैकी एक महत्त्वाची कंपनी म्हणजे गुगल (Google). भारतीय वंशाचे सुंदर पिचाई (Sundar Pichai) गुगलचे सीईओ आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट. इतक्या मोठ्या कंपनीचा सीईओ नजीकच्या भूतकाळात कधी रडला असेल, असा प्रश्न तुमच्या मनात कधी आला होता का? बीबीसीचे प्रतिनिधी अमोल राजन यांनी गुगलच्या कॅलिफोर्नियातल्या मुख्यालयात अलीकडेच घेतलेल्या मुलाखतीत पिचाई यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावर सुंदर पिचाई यांनी दिलेलं उत्तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगावर राज्य करणाऱ्या या व्यक्तीच्या हृदयातल्या संवेदनशील माणसाचं दर्शन घडवणारं आहे.
'कोविड काळात जगभरात सगळीकडे पार्क केलेले मृतदेहांचे ट्रक्स पाहून आणि गेल्या महिन्याभरात भारतात जे काही घडतंय ते पाहून मला रडू आलं होतं,' असं उत्तर सुंदर पिचाई यांनी दिलं होतं.
एप्रिल-मे महिन्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर केला होता. त्या वेळी हजारो लोकांचे बळी गेले होते. तेव्हा किती तरी मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. त्याचा संदर्भ पिचाई यांच्या वक्तव्याला होता.
विनामास्क फिरणाऱ्या 'त्या' पर्यटकांचा भयंकर फोटो खरा की खोटा?
आज पिचाई एका दिग्गज कंपनीच्या सर्वोच्च स्थानावर असले, तरी मातृभूमीशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नाही. त्यांना आपल्या बालपणाविषयी आणि भारताविषयी विचारलं असता, त्याबद्दलच्या आठवणींचे अनेक पदर त्यांनी उलगडून दाखवले. स्वतःच्या वाटचालीविषयीही सांगितलं.
'आता मी अमेरिकी नागरिक आहे; मात्र भारताची (India) माझ्या मनात खोलवर असलेली पाळंमुळं कायम आहेत. मी आज जो काही आहे, त्यात भारताचा वाटा खूप मोठा आहे,' असं सुंदर पिचाई म्हणाले. तमिळनाडूत (Tamilnadu) एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले पिचाई चेन्नईत (Chennai) वाढले. पाहिलेल्या प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाचा आपल्यात बदल घडवण्यात महत्त्वाचा वाटा होता, असं ते सांगतात.
तंत्रज्ञानामुळे आपल्या मर्यादित विश्वाच्या बाहेर डोकावण्याची संधी मिळाली. कुटुंब म्हणून आम्हाला जवळ आणण्याची कामगिरीही तंत्रज्ञानाने केली. दूरदर्शनवर 'सारे जहाँ से अच्छा' हे गाणं दररोज सायंकाळी लागायचं. ते पाहण्यासाठी आम्ही एकत्र यायचो. मी हे माझ्या सहकाऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला आणि एके दिवशी मी त्यांना हे सगळं यू-ट्यूबवर दाखवलं,' असं पिचाई यांनी जुलै महिन्यातल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
ना भपका, ना बडेजाव! फक्त 500 रुपयांत झालं लग्न
'मी तरुण होतो, तेव्हा प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाने मला शिकण्याची आणि वाढण्याची संधी दिली; पण प्रत्येक नवं तंत्रज्ञान दुसरीकडून आपल्याकडे येण्यासाठी वाट पाहावी लागायची. आज भारतातल्या लोकांना तंत्रज्ञानासाठी वाट पाहावी लागत नाही. अनेक प्रकारचं तंत्रज्ञान आज पहिल्यांदा भारतातच तयार होत आहे,' असं पिचाई म्हणाले.
27 वर्षांपूर्वी सुंदर पिचाई जेव्हा तमिळनाडूतून स्टॅनफोर्ड विद्यापीठात (Stanford University) शिक्षणासाठी आले होते, तेव्हाची कहाणीही त्यांनी गेल्या वर्षी एका व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये सांगितली होती.
'माझ्या वडिलांनी माझं अमेरिकेला यायचं विमानाचं तिकीट काढलं, तेव्हा त्यांना वर्षाचा पगार खर्च करावा लागला होता. मी तेव्हा पहिल्यांदाच विमानात बसलो होतो. अमेरिका (USA) महागडी होती. घरी फोन लावायला प्रत्येक मिनिटाला दोन डॉलर खर्च व्हायचा. पाठीवरची सॅक घेण्यासाठी माझ्या वडिलांच्या एका महिन्याच्या पगाराइतके पैसे लागायचे. माझं नशीब आणि तंत्रज्ञानासाठी असलेलं पॅशन आणि खुल्या मनाची माणसं या गोष्टी मला दोन्हीकडे मिळाल्या,' असं त्यांनी सांगितलं होतं.
आज 48 वर्षांचे असलेल्या पिचाई यांनी आयआयटीमध्ये (IIT) इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठात पदव्युत्तर पदवी आणि व्हार्टन स्कूलमध्ये त्यांनी एमबीए केलं. गुगलमध्ये ते 2004 साली रुजू झाले. गुगल क्रोम हा आज जगातला लोकप्रिय इंटरनेट ब्राउझर आहे. तो ब्राउझर, तसंच गुगल टूलबार या दोन्हींचा विकास सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. येत्या काळात क्वांटम कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन गोष्टी येत्या काळात जगात क्रांती घडवून आणतील असं त्यांना वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Sundar Pichai