वॉशिंग्टन, 30 नोव्हेंबर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची कारकीर्द त्यांच्या अनेक निर्णयांमुळे वादग्रस्त ठरली होती. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका नव्या पुस्तकात त्यांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या माहितीमुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या माजी प्रेस सेक्रेटरी स्टेफनी ग्रिशम (Stephanie Grisham) यांनी हे पुस्तक लिहिलं असून, I’ll Take Your Questions Now असं त्या पुस्तकाचं नाव आहे. स्टेफनी ग्रिशम या डोनाल्ड यांच्या पत्नी मेलॅनिया यांच्या माजी चीफ ऑफ स्टाफही होत्या.
स्टेफनी ग्रिशम यांच्या नव्या पुस्तकाची प्रत सीएनएनच्या हाती लागली आहे. त्याआधारे सीएनएनने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. स्टेफनी जेव्हा कामासाठी व्हाइट हाउसमध्ये होत्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या घडामोडींचं चित्रण त्यांनी या पुस्तकात केलं असून, ट्रम्प प्रशासनात असलेल्या असत्यावर आधारलेल्या संस्कृतीबद्दलही त्यांनी लिहिलं आहे.
2019 साली डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल्टर रीड हॉस्पिटलला गुप्तपणे भेट दिली होती, असा दावा ग्रिशम यांनी या पुस्तकात केला आहे. ट्रम्प तिथे आपल्या रुटीन कोलोनोस्कोपीसाठी (Colonoscopy) गेले होते, असं म्हणतात. ग्रिशम यांच्या पुस्तकात कोलोनोस्कोपीचा उल्लेख नाही, मात्र तसे संकेत दिले आहेत. आपल्यावरील उपचारांदरम्यान उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्याकडे कार्यभार जाऊ नये, म्हणून ट्रम्प यांनी हा दौरा गुप्त ठेवला असल्याचा दावा ग्रिशम यांनी केला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळातही असाच प्रकार घडला होता, असंही ग्रिशम यांनी पुस्तकात नमूद केलं आहे.
कोलोनोस्कोपी म्हणजे काय?
पोटदुखी, गुदमार्गाने रक्तस्राव होणं, अपचन, डायरिया अशा प्रकारची पोटाच्या विकाराची लक्षणं दिसत असतील, तर आतड्यांची तपासणी करण्यासाठी कोलोनोस्कोपी केली जाते. त्यात चार फूट लांबीची एक लवचिक नळी गुदद्वारामार्गे रुग्णाच्या मोठ्या आतड्यात सोडली जाते.
पुस्तकातून अनेक गुपितं उघड -
ग्रिशम यांनी पुस्तकात लिहिलं आहे, की पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स आणि कॅरन मॅकडॉगल यांच्याबरोबर असलेल्या अफेयरचे (Affair) किस्से चर्चेत आल्यानंतरचा कालावधी ट्रम्प यांच्यासाठी खूप कठीण होता. त्यांची पत्नी मेलॅनियाही प्रचंड चिडली होती आणि पतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. ट्रम्प-स्टॉर्मी डॅनियल्स यांच्या अफेयरबद्दल कळल्यानंतर ग्रिशमनाही अपमान सोसावा लागला. ट्रम्प यांनी ग्रिशम यांना एअरफोर्स वन या विमानात बोलावून आपल्या पौरुषत्वाविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या.
पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्प यांच्या पौरुषत्वाबद्दल काही सवाल उपस्थित केले होते. त्यावर ट्रम्प यांनी ग्रिशम यांना सांगितलं होतं, की त्यांचं पौरुषत्व ठीक आहे. त्यावर आपण फक्त ओके एवढीच प्रतिक्रिया दिल्याचं ग्रिशम यांनी लिहिलं आहे. 'मी त्या वेळी तिथून जाऊ इच्छित होते, पण ट्रम्प यांनी पुन्हा जोर देऊन सांगितलं, की त्यांचं पौरुषत्व व्यवस्थित आहे. त्या वेळी मी अगदी व्यवस्थितपणे 'येस सर' असं म्हटलं होतं, पण हे खूपच आश्चर्यकारक होतं,' असं ग्रिशम यांनी लिहिलं आहे.
एकदा ट्रम्प यांनी ग्रिशम यांच्या बॉयफ्रेंडला त्याच्या सेक्स लाइफबद्दल विचारलं होतं. त्या वेळी ग्रिशम यांचा बॉयफ्रेंड ट्रम्प यांचा एक सहयोगी होता. ट्रम्प एकदा प्रेस इव्हेंट्समध्ये सातत्याने एका तरुण महिला पत्रकाराबद्दल विचारत होते. तिला एअरफोर्स वनमध्ये त्यांच्या केबिनमध्ये घेऊन यावं आणि ते तिला पाहू इच्छितात, असंही त्यांनी ग्रिशम यांना सांगितलं होतं.
ग्रिशम यांनी पुस्तकात लिहिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प आपले केस स्वतःच कापत असत. त्यांच्याकडे खूप कात्र्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.
2019 मध्ये जी 20 समिटदरम्यान मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोरच ट्रम्प यांनी पुतिन यांच्यावर कडक कारवाई करण्याची अॅक्टिंग केली होती, असं ग्रिशम यांनी लिहिलं आहे. त्या वेळी कॅमेरे रोल होत होते. त्या वेळी त्यांनी पुतिन यांना सांगितलं, की 'मी काही काळासाठी तुमच्याशी कठोर वागेन. हे फक्त कॅमेऱ्यापुरतंच असेल,' असा उल्लेख पुस्तकात आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी या पुस्तकातले किस्से म्हणजे चीप पब्लिसिटी स्टंट अर्थात प्रसिद्धीसाठी केलेले प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. हे पुस्तक म्हणजे ट्रम्प कुटुंबाच्या प्रतिमा हननाचा आणखी एक नवा प्रयत्न आहे, असं ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने सांगितलं. मेलॅनिया ट्रम्प यांच्या ऑफिसकडूनही ग्रिशम यांच्या या पुस्तकावर कडक टीका करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Donald Trump, USA, White house