बीजिंग, 26 मार्च : चीनच्या हुबेई प्रांतातला लॉकडाउन तब्बल दोन महिन्यांनी उठला आणि लोकांनी बस, ट्रेन स्टेशनवर गर्दी केली. आपल्या आप्तजनांपासून सव्वादोन महिने लांब राहिलेल्या आणि घरात कोंडलेल्या नागरिकांना पहिल्यांदाच मोकळीक मिळाली. Coronavirus चा प्रसार याच हुबेई प्रांतातून जगभर झाला. या कोरोनाचं एपिसेंटर अर्थात केंद्रबिंदू ठरलेलं वुहान शहर मात्र अजूनही बंद आहे. वुहानचा लॉकडाउन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उठवण्यात येईल.
वुहान ही या हुबेई प्रांताची राजधानी आहे. वुहानमध्ये कोरोनाव्हायरसनं थैमान सुरू झाल्यावर हा संपूर्ण प्रांत लॉकडाउन करण्यात आला होता. कुणालाही विनापरवानगी रस्त्यावर यायला मनाई होती. सध्या महाराष्ट्रात असलेल्या लॉकडाउनपेक्षा हुबेईचं लॉकडाउन अधिक कठोर होतं, असं आता समोर येत असलेल्या काही व्हिडीओंवरून स्पष्ट होईल.
वाचा - कोरोनाचं नवं केंद्र झालं स्पेन! मृतांच्या शेजारी झोपत आहेत जवान
हुबेईला जाणारे सर्व रस्ते, ट्रेन, विमानं पूर्णपणे बंद होतं. अनेक जण या लॉकडाउनमुळे या प्रांतातच अडकले. पण कुणालाही लॉकडाउन सोडून बाहेर पडायची परवानगी नव्हती. आठवड्यातून फक्त एकदा घरातल्या एकाच व्यक्तीला बाहेर जीवनावश्यक वस्तू आणायला जायची परवानगी होती. या कडक बंदच्या अंमलबजावणीमुळेच वुहान आणि हुबेईचा कोरोनाव्हायरचा उद्रेक आटोक्यात आला. सलग 18 दिवस एकही स्थानिक रुग्ण या प्रांतात सापडला नाही. त्यामुळे तब्बल 62 दिवसांनी हुबेई खुलं झालं.
अद्यापही मोजक्या ट्रेन आणि बस सुरू आहेत. 30 टक्के बस सेवा सुरू आहे आणि त्यातून फक्त निरोगी लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. ज्यांच्याकडे ग्रीन हेल्थ कोड आहे त्यांनाच घराबाहेर पडायची परवानगी आहे. कुठलंही लक्षण नसलेली आणि कुठलाही आजार नसलेली मंडळीच अशा ग्रीन कोडसह प्रवास करण्यास पात्र आहेत.
9 आठवड्यांनंतर आपल्या पालकांना भेटायला जाणारे, आपल्या मुलांना भेटायला जाणारे आणि आपल्या घरी परतण्याची इच्छा असणारे चिनी नागरिक हुबेई प्रांतातून बाहेर पडताना दिसले.
हुबेईची लोकसंख्या साधारण 6 कोटी आहे. बुधवारपासून घरात बंद असलेल्या या जनतेला मोकळा श्वास घेता आला. चीनमध्ये 81,218 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यातून आतापर्यंत 3,281 मृत्यू झाले आहेत. यातले बहुतेक मृत्यू हुबेई आणि त्यातही वुहानमध्ये झाले आहेत.
वुहान अजूनही बंदच आहे. येत्या 8 एप्रिलला कुठलाही नवा रुग्ण आढळला नाही, तर वुहानची टाळेबंदी उठवण्यात येईल.
अन्य बातम्या
मुंबईच्या चाळीत पोहोचला Corona; 4 रुग्णांमुळे परिस्थिती जाऊ शकते हाताबाहेर
लॉकडाउन 21 दिवसानंतरही सुरू राहू शकतो का? सरकारच्या घोषणांनी शक्यता वाढली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Wuhan