वॉशिंग्टन, 23 फेब्रुवारी : अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्हिएतनाममधील (Vietnam) परिषदेदरम्यान उत्तर कोरियाचे (North Korea) प्रमुख किम जोंग उन (Kim Jong Un) यांना एअरफोर्स वन या विमानातून घरापर्यंत प्रवास करण्याची ऑफर दिली होती. तत्कालीन वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सीएनएनशी बोलताना याबाबत माहिती दिली. या माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, अशी ऑफर देताना काही अडचणी येतील का? अशी विचारणा ट्रम्प यांनी त्यांच्या कोणत्याही सहाय्यकाकडे केली नाही. ट्रम्प यांनी किम यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण नात्याने, केवळ मित्रासाठी केलं, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
याबाबत बीबीसीने (BBC) सर्वप्रथम वृत्त दिलं होतं. ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील अशिया खंडाचे तज्ज्ञ मॅथ्यू पॉटिंगर यांनी बीबीसीला सांगितलं, की डोनाल्ड ट्रम्प यांनी किम यांना एअर फोर्स वन या त्यांच्या विमानातून घरापर्यंत प्रवास करण्याची ऑफर दिली होती. किम हे चीनमार्गे हुनोई येथे मल्टी डे ट्रेनमधून प्रवास करुन आले होते. ही बाब ट्रम्प यांना माहिती होती. त्यावर ट्रम्प म्हणाले की तुमची इच्छा असेल, तर मी तुम्हाला दोन तासांत तुमच्या घरी पोहोचवू शकतो. मात्र किम यांनी नकार दिला होता.
(वाचा - प्रिन्स हॅरी यांनी तोडले ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंध; 7 मार्चला सांगणार कारण)
किम यांनी आपल्या देशातील सर्व अमेरिकन निर्बंध हटवण्याचा आग्रह धरल्यानंतर ट्रम्प यांनी कोणताही संयुक्त करार केला नाही. हुनोई (Hunoi) परिषद संपल्यानंतर या हुकूमशहाला ट्रम्प यांनी ही जबरदस्त ऑफर दिली होती. यावेळी ट्रम्प त्यांनी सांगितलं की, किम यांनी अण्विक अस्त्रं नष्ट करण्याच्या दृष्टीने काही पावले उचलण्याची ऑफर दिली होती. परंतु देशावरील निर्बंध हटवण्यासाठी ही हमी पुरेशी नव्हती. त्या कालावधीत नियोजन करण्यापूर्वीच हे सर्व तुटल्याने, कधीकधी आपल्याला चालतच जावं लागतं, अशी प्रतिक्रिया त्यावेळी ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
उत्तर कोरियामध्ये मानवाधिकारांचं सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या किम जोंग उन या हुकूमशहाला ट्रम्प यांनी दिलेल्या ऑफरच्या बातम्यांमुळे या हुकूमशहा सोबत ट्रम्प यांच्या असलेल्या मित्रत्वाच्या संबंधांची नव्याने चौकशी होण्याची शक्यता आहे.
(वाचा - या कारणामुळे एक-दोन नव्हे सीमेवर हजारो गावं निर्माण करत आहे चीन)
या परिषदेत किम यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी मानवी हक्कांचा उल्लेख टाळला होता. त्याऐवजी किम यांनी अण्वस्त्रं नष्ट करण्याचं मान्य केल्यास उत्तर कोरियात संभाव्य आर्थिक गुंतवणूकीवर लक्ष केंद्रीत केलं जाईल, असं सांगितलं होतं. एका पत्रकाराने किम यांना या विषयांवर चर्चा झाली की नाही असं विचारलं असता, ट्रम्प यांनी उत्तर देत आम्ही सर्व गोष्टींवर चर्चा करत आहोत, असं सांगितलं.
यापूर्वी माजी राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी किम यांच्या प्रेमात पडणं, आणि त्यांच्या असामान्य संबंधांना अधोरेखित करणाऱ्या पत्रांची देवाणघेवाण करण्याबाबत समर्थन केलं होतं. ट्रम्प यांनी किम यांच्याकडून सुंदर पत्र मिळाल्याने अभिमान वाटत असल्याचं स्पष्ट केलं होतं. यावेळी ते आम्ही जे करतोय ते ठिक आहे, असं म्हणाले होते. त्यानंतर किम यांनी ट्रम्प यांना असं पत्र पाठवलं नसल्याचं स्पष्ट करत, स्वार्थी हेतूनं वैयक्तिक नातेसंबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्योंगयांगने (Pyongyang) केला होता.