नवी दिल्ली, 24 जून: कोरोनाच्या पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतही
(Coronavirus) अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोना काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली, तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. भारतात पुरुषांसह अनेक महिलाही नोकरीच्या उपलब्धतेबाबत चिंतेत आहेत. नोकरी करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत, महिलांना नोकरी शोधण्यात अधिक संघर्ष करावा लागत आहे. लिंक्डइन वर्कफोर्स कॉन्फिडेन्स इंडेक्सच्या
(Linkedin) मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. नोकरी आणि उत्पन्नाचं नुकसान याचा परिणाम पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक होत असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
8 मे ते 4 जून पर्यंत, 1891 व्यावसायिकांच्या सर्वेक्षणातील प्रतिसादावर आधारित अहवालात, सर्व देशभर असलेल्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीय व्यावसायिकांना संघर्ष सहन करावा लागला. याचा सर्वाधित परिणाम नोकरदार महिलांमध्ये दिसून आला. आर्थिक असुरक्षिततेदरम्यान रोजगाराच्या बाबतीत महिला अधिक चिंताजनक स्थितीत असल्याचं समोर आलं.
रिपोर्टमध्ये खुलासा -
या रिपोर्टमध्ये आढळलं, की काम करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत, काम करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास चार पटींनी कमी झाला आहे. याचा परिणाम स्त्रियांच्या आर्थिक स्थिरतेवरही झाला आहे, कारण चारपैकी एक नोकरदार महिला (23 टक्के) वाढता खर्च किंवा कर्जाबाबत चिंतेत आहेत. तर दुसरीकडे 10 पैकी एक पुरूष (13 टक्के) यासंबंधी चिंतेत आहे.
लिंक्डइनचे इंडिया कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्ता यांनी सांगितलं, की जसं भारत कोरोनाच्या संकटातून काहीसं वर येत आहे, तसं हळू-हळू भरतीचा दर एप्रिलमध्ये 10 टक्क्यांवरुन मेच्या अखेरीस 35 टक्क्यांपर्यंत आहे. अर्थव्यवस्थेतील अनेक भाग हळू-हळू खुले होत आहेत, तसं सॉफ्टवेअर आणि आयटी, हार्टवेअर व्यावसायिकांना त्यांच्या भविष्याबद्दल विश्वास वाढत आहे. दरम्यान, लेबर मार्केट अपडेटनुसार 2020 मध्ये दूरच्या नोकरी पोस्टिंगमध्ये 35 पटीने वाढ झाली आहे आणि मे 2021 पर्यंत यात तिप्पट वाढ होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.