नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: काही महिन्यांपूर्वी एयरटेलसह (Airtel) जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. आता एयरटेलने या वर्षी पुन्हा टॅरिफ प्लॅनमध्ये (Mobile Tariff Hike) वाढ करणार असल्याचे संकेत दिले आहेत. प्रति युजर सरासरी महसूल (ARPU) 200 रुपयांपर्यंत नेण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्यासाठीच कंपनी ग्राहकांना टॅरिफ वाढवून धक्का देण्याच्या तयारीत आहे.
भारतीय एयरटेल लिमिटेडने बुधवारी सांगितलं, की तिसऱ्या तिमाहीमध्ये (Airtel Q3 Results) झालेल्या चांगल्या कामगिरीसाठी टॅरिफ वाढ आणि गुगलने केलेल्या गुंतवणुकीचं (Google Investment In Airtel) महत्त्वपूर्ण योगदान आहे. या तिमाहीमध्ये कंपनीची कमाई 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षात याच तिमाहीमध्ये 26,518 कोटी रुपये होती.
या वर्षात पुन्हा वाढणार दर -
एयरटेलच्या टॉप मॅनेजमेंटने दिलेल्या माहितीनुसार, प्लॅनच्या किमती पुन्हा वाढू शकतात. तसंच जर दोन ते चार महिन्यात टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ झाली नाही, तर या वर्षाच्या अखेरीस यात वाढ होऊ शकते. कंपनीला 2022 मध्ये ARPU प्रति युजर सरासरी महसूल 200 रुपये दरमहा करण्याची अपेक्षा आहे.
या तिमाहीमध्ये कंपनीला 830 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तर मागील वर्षाच्या तिमाहीमध्ये कंपनीला 854 कोटी रुपयांचा निव्वळ फायदा झाला होता. कंपनीच्या प्रति ग्राहक सरासरी कमाईमध्ये (ARPU) मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. भारती एयरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल फोन सेवांच्या दरांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे प्रति ग्राहक सरासरी कमाई (ARPU) 163 झाली आहे.
Airtel वर कर्ज वाढत आहे. डिसेंबर 2021 च्या तिमाहीमध्ये 1.59 लाख कोटी रुपये कंपनीवर कर्ज होतं, जे एक वर्षापूर्वी याच काळात 1.47 लाख कोटी रुपये होतं. त्याचाच परिणाम टॅरिफ प्लॅनच्या वाढत्या किमतीवर होतोना दिसतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airtel, Inflation, Money, Recharge, Tech news, Technology, Telecom service, Vodafone idea tariff plan